नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारीला भेट देणार आहेत. ते तेथील ‘विवेकानंद रॉक मेमोरिअल’ येथे २ दिवस ध्यान करतील. याच ठिकाणी स्वामी विवेकानंद यांनी ध्यान केले होते. लोकसभेच्या निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात १ जून या दिवशी ५७ जागांसाठी मतदान होणार आहे. या जागांसाठीचा निवडणुकीचा प्रचार ३० मेच्या सायंकाळी ५ वाजता संपणार आहे. मोदी ३० मे या दिवशी संध्याकाळी कन्याकुमारीला पोचतील. ते ‘विवेकानंद रॉक मेमोरिअल’वर ३० मेच्या रात्रीपासून ते १ जूनच्या संध्याकाळपर्यंत ध्यानधारणा करतील.
‘विवेकानंद रॉक’ हे तमिळनाडूमधील कन्याकुमारी येथील समुद्रात असलेले एक स्मारक आहे. हे एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. किनार्यापासून अनुमाने ५०० मीटर अंतरावर समुद्रातील दोन खडकांवर हे स्मारक बांधले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते एकनाथ रानडे यांनी या खडकांवर विवेकानंद स्मारक मंदिर उभारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. २ सप्टेंबर १९७० या दिवशी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. व्ही.व्ही.गिरी यांनी या स्मारकाचे उद्घाटन केले होते.
एप्रिलमध्ये येणार्या चैत्र पौर्णिमेला तेथे चंद्र आणि सूर्य दोघेही एकाच क्षितिजावर समोरासमोर दिसतात. वर्ष १८९३ मध्ये जागतिक धर्म परिषदेत सहभागी होण्यापूर्वी स्वामी विवेकानंद तमिळनाडूतील कन्याकुमारी येथे गेले होते. तेथे समुद्रात ५०० मीटर अंतरावर त्यांना पाण्याच्या मध्यभागी एक मोठा खडक दिसला, ते तेथे पोहून गेले आणि तेथे त्या खडकावर बसून त्यांनी ध्यान केले होते.
वर्ष २०१९ मधील लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानापूर्वीही पंतप्रधान मोदी केदारनाथला गेले होते. तेथे रुद्र गुहेत त्यांनी १७ तास ध्यान केले होते.
🛜 सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
https://thalaknews.com/join-our-group