नवरात्रोत्सव हा देवीचा उत्सव ! या काळात देवीचे तत्त्व पृथ्वीवर अन्य दिवसांपेक्षा १ सहस्र पटींनी अधिक प्रमाणात येत असते. त्याचा लाभ होण्यासाठी घरोघरी घटस्थापना करणे, देवीसमोर नंदादीप लावणे, कुमारिकापूजन, उपवास करणे या माध्यमातून देवीची उपासना केली जाते. अनेक भाविक देवीच्या जागृत मंदिरांत जाऊन दर्शन घेतात, तेथे पूजा करतात. यंदा कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर मंदिरे आणि धार्मिक स्थळे बंद आहेत. असे असूनही आम्ही या सदराच्या माध्यमातून वाचकांना ५१ शक्तिपिठांपैकी काही तीर्थक्षेत्रांचे दर्शन घडवणार आहोत. ‘या अत्यंत जागृत तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेऊन सर्वांचा भक्तीभाव वृद्धींगत व्हावा’, अशी आदिशक्ति जगदंबेच्या चरणी प्रार्थना !

दशमहाविद्यांमध्ये श्री बगलामुखी ही एक महाविद्या आहे. श्री बगलामुखीदेवीचे मंदिर कांगडा (हिमाचल प्रदेश) जिल्ह्यातील बनखंडी गावामध्ये आहे. पांडुलिपीमध्ये देवीचे जसे वर्णन आहे, त्याच स्वरूपात देवी येथे विराजमान आहे. देवीचे हे मंदिर महाभारत काळातील आहे. द्वापरयुगामध्ये पांडवांनी अज्ञातवासात असतांना एका रात्रीत हे मंदिर बांधले आणि पूजाअर्चा केली. या मंदिरात प्रथम अर्जुन आणि भीम यांनी युद्धकलेत यशप्राप्ती होण्यासाठी देवीची उपासना केली होती. शत्रूनाशिनी देवी बगलामुखी मंदिरामध्ये विविध प्रकारच्या त्रासांच्या निवारणासाठी शत्रूनाश हवन करवून घेतले जाते. देवीच्या मंदिरामध्ये हवन केल्यानेे मनोवांच्छित फलप्राप्ती होते.

एकदा दानवाने ब्रह्मदेवाचा ग्रंथ चोरून पाताळात लपवून ठेवला. ‘त्याला पाण्यामध्ये मनुष्य किंवा देवता मारू शकणार नाही’, असे वरदान होते. अशा वेळी ब्रह्मदेवाने देवी भगवतीची उपासना केली. यातून श्री बगलामुखीदेवी अवतरली. देवीने बगळ्याचे रूप धारण करून त्या दानवाचा वध केला आणि ब्रह्मदेवाला त्यांचा ग्रंथ परत केला.

सत्ययुगात एकदा सृष्टीत भयंकर वादळ आले. या वादळाला शांत करण्यासाठी भगवान श्रीविष्णूने तपश्‍चर्या करून श्री बगलामुखीदेवीला प्रसन्न करून घेतले होते. लंकेवर विजय मिळवण्यासाठी श्रीरामाने शत्रूनाशिनी श्री बगलामुखीदेवीचे पूजन केले आणि त्याला विजय प्राप्त झाला.’

Source – https://sanatanprabhat.org/marathi/414369.html