गोवा : बसमध्ये सोनसाखळी चोरणार्‍या ३ बांगलादेशी महिला ताब्यात (bangladeshi women arrested)

3

डिचोली, – प्रवासी बसमधील एका ज्येष्ठ महिलेच्या अंगावर ओढणी टाकून तिच्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरणार्‍या ३ बांगलादेशी महिलांना बसचालक सूरज मोरजकर आणि इतर यांनी शिताफीने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. (bangladeshi women arrested) तिन्ही महिलांकडे कोणतेही ओळखपत्र नसल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते भगवान हरमलकर यांनी केली आहे.

७ जून या दिवशी दीपाली वायंगणकर या ज्येष्ठ महिलेच्या गळ्याभोवती ओढणी टाकून ३ महिलांनी तिच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली. यानंतर गोंधळ होताच बोर्डे बसस्थानकावर बस थांबवली असता या तिन्ही महिलांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र बसचालक सूरज मोरजकर याने बस रस्त्यावरच थांबवून महिलांचा पाठलाग केला. एका इमारतीच्या ठिकाणी लपण्याच्या प्रयत्नात असतांना लोकांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांना कळवले. या प्रकरणी पोलीस उपअधीक्षक सागर एकोस्कर आणि पोलीस निरीक्षक राहुल नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली अन्वेषण चालू आहे. या वेळी सर्वांनी बसचालक सूरज मोरजकर यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते भगवान हरमलकर यांनी कोणतेही ओळखपत्र नसतांना फिरणार्‍या बांगलादेशी नागरिकांसह इतरांची झडती घेण्याची मागणी केली आहे. चोरीचे प्रकार वाढत असल्याने लोकांना जागृत रहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.