कुवेत – मध्ये बुधवारी पहाटे एका सहा मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीत मृतांची संख्या ४९ वर पोहोचली आहे, तर ५० हून अधिक जण जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मृतांपैकी ४० हून अधिक जण भारतीय आहेत. ही इमारत परदेशी कामगारांच्या वास्तव्याची होती.
दरम्यान, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी त्यांच्या कुवेती समकक्ष अब्दुल्ला अली अल-याह्या यांच्याशी संवाद साधला. कुवेती अधिकाऱ्यांनी आगी नंतर केलेल्या प्रयत्नांची माहिती जयशंकर यांना दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, बहुतेक मृत्यू धुरामुळे श्वास गुदमरल्यामुळे झाले, तेव्हा रहिवासी झोपेत होते. अनेक रहिवाशांना इमारतीतून बाहेर काढण्यात आले.
अग्नीत मृत झालेल्या काही भारतीयांचे मृतदेह इतके जळून गेले आहेत की त्यांची ओळख पटविणे शक्य नाही. डीएनए चाचणीद्वारे मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे, असे किर्ती वर्धन सिंह यांनी सांगितले. किर्ती वर्धन सिंह यांनी परराष्ट्र राज्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर त्वरित गल्फ देशाचा दौरा केला. त्यांनी पुष्टी केली की मृतदेह घरी आणण्यासाठी भारतीय हवाई दलाचे विमान सज्ज आहे.