बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल अखेर स्पष्ट झाला असून या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांनी दणदणीत आणि ऐतिहासिक विजय मिळवला आहे. सुरुवातीपासूनच आघाडीवर असलेल्या सुनेत्रा पवार यांनी मतमोजणीच्या प्रत्येक टप्प्यावर प्रतिस्पर्ध्यांवर मोठी आघाडी कायम ठेवली.
अंतिम फेऱ्यांपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार, सुनेत्रा पवार यांनी तब्बल २ लाख १८ हजार ९३० मतांच्या विक्रमी फरकाने विजय मिळवत नवा इतिहास रचला. हा विजय केवळ बारामतीपुरता मर्यादित नसून देशात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा नवा विक्रम म्हणून नोंदवला गेला आहे.
या निकालाने २०१९ मध्ये माजी आमदार अजित पवार यांनी मिळवलेल्या मताधिक्याचा विक्रमही मागे टाकला आहे. त्यामुळे बारामतीत पवार कुटुंबाचा प्रभाव आणखी मजबूत झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रचार करत सुनेत्रा पवार यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले होते. जय पवार आणि पार्थ पवार यांच्यासह अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी मतदारांपर्यंत पोहोचून समर्थन मिळवले. याशिवाय विविध राजकीय पक्ष आणि स्थानिक संघटनांनीही त्यांना पाठिंबा दिला होता.
विशेष म्हणजे, या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या इतर उमेदवारांना अत्यल्प मते मिळाल्याचे चित्र समोर आले आहे. करूणा मुंडे यांना फक्त १२५ मते, तर अभिजित बिचुकले यांना १२१ मते मिळाली. इतर कोणत्याही उमेदवाराला हजार मतांचा टप्पा देखील गाठता आला नाही.
एकूणच, बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी मिळवलेला हा विजय केवळ राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा नसून, मताधिक्याच्या दृष्टीनेही ऐतिहासिक ठरला आहे. आगामी राजकारणात या निकालाचे दूरगामी परिणाम दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


