अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांतील माता-भगीनींच्या सन्मानासाठी कॅप्टिव्ह मार्केट योजना
अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांतील माता-भगीनींच्या सन्मानासाठी कॅप्टिव्ह मार्केट योजना

मुंबई – अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबातील माता-भगीनींच्या सन्मानासाठी प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी मोफत देण्यासाठी वस्त्रोद्योग विभागामार्फत कॅप्टिव्ह मार्केट योजना सुरू करण्यात आली आहे. काही साड्या निर्मितीदोष अथवा फाटलेल्या आढळल्यास त्या त्वरित बदलून देण्याची व्यवस्था महामंडळाने अगोदरच कार्यान्वित केलेली आहे.याबाबत काही तक्रारी असतील तर  info@mspc.org.in  ई-मेलवर तक्रार करावी  किंवा  022-27703612 नंबर वर  (कार्यालयीन वेळ सकाळी  9.45 ते सायं. 6.15) या वेळत संपर्क करावा, असे आवाहन वस्त्रोद्योग विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. कॅप्टिव्ह मार्केट योजनेमुळे राज्यातील २४ लाख ८० हजार अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांतील माता-भगीनींना साड्यांचा लाभ मिळाला आहे. त्याबरोबरच शेतकऱ्यांच्या कापसाला मागणी वाढून सूतगिरणींच्या सुताला भाव व  स्थानिक यंत्रमागधारकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

सदर साड्या पुरवठा करण्याकरिता वस्त्रोद्योग विभाग अंतर्गत कार्यरत असलेल्या राज्य यंत्रमाग महामंडळास नोडल एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या महामंडळाने ई-निविदाद्वारे निश्चित करण्यात आलेल्या पॅनल मधील सहकारी संस्था / एमएसएमई कडून साड्यांचे उत्पादन करून घेतले आहे. दि.११ मार्च २०२४ पर्यंत महामंडळाने राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील तालुका स्तरावरील गोडाऊनपर्यंत सर्व साड्यांचा १०० टक्के  पुरवठा पूर्ण केला आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेकडून आज पर्यंत १३ लाख १७ हजार साड्यांचे वितरण पूर्ण झाले असून, शिल्लक साड्यांचे त्वरित वितरण करण्याच्या सूचना अन्न ,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत देण्यात आल्या आहेत.

राज्यामध्ये काही दुकानात खराब साड्या, फाटलेल्या साड्या मिळाल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तथापि आतापर्यंत निदर्शनास आलेल्या खराब झालेल्या साड्या  या काही ठिकाणच्या असून, या पुरवठा करण्यात आलेल्या साड्यांच्या प्रमाणात फारच अत्यल्प प्रमाणात आहेत. तरी त्या ठिकाणी महामंडळाने आपले अधिकारी पाठवून त्वरित साडी बदलून देण्याची व्यवस्था केली आहे. तसेच महामंडळाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपले अधिकारी पाठवून साडीचा दर्जा, पुरवठा व वितरणाबाबत तपासणी अहवाल मागवला आहे.