कोरोना प्रतिबंधात्मक लस ‘कोव्हॅक्सिन’ बनवणार्या ‘भारत बायोटेक’ या आस्थापनाने ‘एक्स’वरून पोस्ट करून म्हटले, ‘आमची लस सुरक्षित आहे. ती बनवतांना आमचे प्रथम प्राधान्य हे लोकांची सुरक्षितता होती, तर दुसरे प्राधान्य लसीचा दर्जा !’ ‘कोव्हिशिल्ड’वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतांना ‘भारत बायोटेक’ने तिच्या लसीविषयी हे स्पष्टीकरण दिले आहे. ‘कोव्हिशिल्ड’च्या वापरामुळे शरिरात रक्ताच्या गुठळ्या निर्माण होतात. त्यामुळे पुढे हृदयविकारही होऊ शकतो, अशी स्वीकृती तिचे उत्पादन करणार्या अॅस्ट्राझेनेका आस्थापनाने लंडनच्या न्यायालयात दिली आहे.

आस्थापनाने सांगितले की, भारत शासनाच्या ‘कोव्हिड-१९’ लस कार्यक्रमातील ‘कोव्हॅक्सिन’ ही एकमेव लस आहे, ज्याच्या चाचण्या भारतात घेण्यात आल्या. लसीचा परवाना मिळवण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून २७ सहस्र लोकांवर कोव्हॅक्सिनची चाचणी घेण्यात आली.