केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी उज्ज्वला गॅस योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी साडेबारा वाजता दुरदृष्य प्रणाली द्वारे होणार आहे.

उत्तर प्रदेशातील महोबा इथं हा कार्क्रम होणार असून, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी हे देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यावेळी प्रधानमंत्री या योजनेच्या लाभार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. उज्ज्वला योजनेच्या या दुसऱ्या टप्प्यात देशातील कमी उत्पन्न गटातील कुटुंबाना १ कोटी स्वयंपाकाच्या गॅसची जोडणी देण्यात येणार असून, लाभार्थ्यांना मोफत गॅस शेगडी आणि पहिला सिलेंडरही देण्यात येणार आहे.

तसंच जोडणीसाठी अनामत रक्कमही घेण्यात येणार नाही. गॅस जोडणी साठी अर्ज करण्याची प्रक्रियाही अत्यंत सुलभ करण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १ मे २०१६ रोजी उत्तरप्रदेशातील बलिया जिल्ह्यात या योजनेच्या पहिल्या टप्प्याचा प्रारंभ करण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात या उज्वला योजनेद्वारे आतापर्यंत देशातील ८ कोटी कुटुंबाना स्वयंपाकाच्या गॅसची जोडणी देण्यात आली आहे.