दहावी आणि बारावी परीक्षांमध्ये सामूहिक नकल आढळल्यास, संबंधित परीक्षा केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच, नकल करण्यास मदत करणाऱ्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून परीक्षा तयारी आणि कार्यवाहीबाबत चर्चा केली. यावेळी त्यांनी परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात अनधिकृत व्यक्तींना पूर्णतः प्रतिबंध करण्याचे, तसेच विद्यार्थ्यांनी कोणतेही कॉपीचे साहित्य जवळ बाळगू नये याची खबरदारी घेण्याचे निर्देश दिले.
संवेदनशील परीक्षा केंद्रांवर ड्रोन आणि व्हिडिओ कॅमेराद्वारे पूर्णवेळ निगराणी ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर राहील, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
या कठोर उपाययोजनांमुळे राज्यातील परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा सुनिश्चित होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.