मुंबई – महाराष्ट्रामध्ये कुसुमाग्रज यांची जयंती ‘मराठी भाषा गौरवदिन’ म्हणून साजरी केली जाते. याच दिवशी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, अशी मागणी राज्याचे मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री किशन रेड्डी यांच्याकडे केली. २१ फेब्रुवारी या दिवशी देसाई यांनी देहली येथे जाऊन रेड्डी यांची भेट घेतली. या वेळी त्यांच्या समवेत मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, अभिनेते आणि चित्रपट निर्माते श्रीरंग गोडबोले यांसह अन्य अधिकारी उपस्थित होते.
या वेळी देसाई यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी आवश्यक असलेल्या निकषांची सविस्तर माहिती केंद्रीय मंत्र्यांना दिली. या भेटीविषयी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती देतांना सुभाष देसाई म्हणाले, ‘‘मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याविषयी निकष आणि अटी यांची पूर्तता होत असल्याचे केंद्रीय मंत्री रेड्डी यांनी सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचाही याविषयी सकारात्मक दृष्टीकोन आहे. केंद्र सरकार यावर शक्यतितक्या लवकर निर्णय घेणार असल्याचेही रेड्डी यांनी सांगितले.’’