नाशिक – स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट प्रदर्शित होऊन ३ आठवडे झाले आहेत. तरीही या चित्रपटाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाचे मुख्य अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक रणदीप हुडा यांनी ५ एप्रिल या दिवशी येथील भगूर या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मस्थानी भेट दिली. या वेळी त्यांनी सावरकर यांच्या छायाचित्राला मानवंदना देत मनोगत व्यक्त केले. हुडा म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केलेल्या कार्यामुळे अनेक वाद निर्माण झाले, तर काहींनी त्यांच्या कार्यावर संशय घेतला.
स्वातंत्र्यापूर्वी अत्याचारी ब्रिटीश आणि स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय राजकारणी यांनी त्यांच्यावर येनकेन प्रकारेण अन्यायच केला. असे असूनही सावरकर क्रांतीकारकांना प्रेरणा देत राहिले आणि आज इतक्या दशकांनंतरही त्यांच्या विचारांची समर्पकता तेवढीच आहे.त्यांनी केलेला त्याग आणि दाखवलेले साहस यांमुळे त्यांना काळ्यापाण्याची शिक्षा झाली. सावरकरांच्या जन्मस्थानी ऊर्जास्त्रोत जाणवतो आणि त्यात डुंबायला होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या या दिव्य भूमीला मी नमन करतो .