Hindu Temple Abu Dhabi : संयुक्त अरब अमिरातीतील पहिल्या हिंदु मंदिराचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन !

19

अबुधाबी – संयुक्त अरब अमिरातीची राजधानी अबुधाबीमध्ये पहिले हिंदु मंदिर सिद्ध झाले आहे. मंदिराचे उद्घाटन १४ फेब्रुवारी २०२४ या दिवशी होणार आहे. या हिंदु मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्यात आले असून पंतप्रधानांनी हे निमंत्रण स्वीकारले आहे. या वेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, हा ऐतिहासिक क्षण असेल.

अबुधाबीतील ‘अल् वाक्बा’ नावाच्या ठिकाणी २० सहस्र चौरस मीटरच्या क्षेत्रात हे मंदिर बांधण्यात आले आहे. भारतीय दूतावासाच्या आकडेवारीनुसार, संयुक्त अरब अमिरातीमध्ये अनुमाने २६ लाख भारतीय रहातात, जे तेथील लोकसंख्येच्या जवळजवळ ३० टक्के आहेत. संयुक्त अरब अमिराती सरकारने अबुधाबीमध्ये मंदिर बांधण्यासाठी २० सहस्र चौरस मीटर भूमी दिली होती. वर्ष २०१५ मध्ये पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या दौर्‍यावर गेले होते तेव्हा संयुक्त अरब अमिराती सरकारने याची घोषणा केली होती. वर्ष २०१८ मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या दुबई दौर्‍याच्या वेळी तेथील ऑपेरा हाऊसमधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेने या मंदिराची पायाभरणी केली होती.