प्रयागराज (उत्तरप्रदेश) – महाकुंभ मेळ्यात त्रिवेणी संगमात स्नान करणाऱ्या आणि कपडे बदलणाऱ्या महिलांचे गुप्त छायाचित्रण करून त्यांची ऑनलाईन विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तरप्रदेश पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत इन्स्टाग्रामवरील एका खात्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या खात्यावर महिलांचे आंघोळ करतानाचे अनेक व्हिडिओ अपलोड करण्यात आले होते. तपासादरम्यान पोलिसांना असे आढळले की, या खात्यावर ४ जून २०२४ रोजी पहिली पोस्ट करण्यात आली होती, तर ११ फेब्रुवारी २०२५ ते १६ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत एकूण ३३ व्हिडिओ अपलोड करण्यात आले. या व्हिडिओंमध्ये महिला संगमात स्नान करताना किंवा कपडे बदलताना दिसत असून, ते १,९०० ते ४,००० रुपयांमध्ये विकले जात असल्याचे उघड झाले आहे.
पोलिसांनी या गैरप्रकाराची दखल घेत कॅलिफोर्नियातील इन्स्टाग्रामच्या मुख्य कार्यालयाला ई-मेल पाठवून संबंधित खात्याची माहिती मागितली आहे. हा गुन्हा अत्यंत गंभीर असल्याने पोलीस पुढील तपास करत असून, या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई केली जाणार आहे.






