News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

अलिबाग,दि.21 – इरशाळगडाच्या पायथ्याला डोंगरात वसलेल्या दुर्घटनाग्रस्त आदिवासी पाड्यावर बचाव व
मदत कार्य युध्दपातळीवर सुरु असून यासाठी शासकीय यंत्रणा संपूर्ण प्रयत्नशील आहे. या गावातील नागरिकांचे कायमस्वरुपी
पुनर्वसन होईपर्यंत जुने मुंबई-पुणे महामार्गावरील चौक गावानजिक असलेल्या शासकीय जागेत तात्पुरत्या स्वरुपात पुनर्वसन करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक ती सर्व तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे.

तसेच इरशाळवाडीसाठी एक स्वतंत्र मदत कक्ष स्थापन करण्यात आला असून अद्यापही शोध न लागलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी एक स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे उपस्थित होते.

इरशाळवाडीच्या दुर्घटनेची माहिती समजल्यानंतर जिल्हा प्रशासन तातडीने घटनास्थळी पोहोचले होते. या गावांतील
43 कुटुंबातील 229 लोकांपैकी 143 व्यक्तींचा शोध घेण्यात आला असून अद्यापही 86 नागरिकांचा शोध कार्य सुरु आहे.

इरसाळवाडी गावांतील नागरिकांचा शोध घेण्यासाठी समिती
स्थापन करण्यांत आली असून जिल्ह्यातील इतर नागरिकांनी व त्यांचे नातेवाईकांनी इरसाळवाडी येथील नागरिकांची काही
माहिती असल्यास दूरध्वनीव्दारे संपर्क साधावा अथवा पोलीस स्टेशन चौक, ता. खालापूर प्रत्यक्ष भेटावे, असे आवाहन
जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी यावेळी केले.

गावातील नागरिकांचे जुने मुंबई-पुणे महामार्गावरील चौक गावानजिक असलेल्या शासकीय जागेत तात्पुरत्या
स्वरुपात पुनर्वसन करण्यात येत असून त्यासाठी 32 कंटेनर सज्ज करण्यात आले आहेत. याठिकाणी 20 शौचालये, 20 बाथरुम उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. गृहोपयोगी सर्व साहित्य तसेच जीवनावश्यक वस्तूंचे किटस तयार ठेवण्यात आले आहेत. शालेय विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय करण्यात आली असल्याचे डॉ. म्हसे यांनी यावेळी सांगितले.

दुर्घटनेच्या ठिकाणी बचाव कार्य वेगाने सुरु असून एनडीआरएफचे 4 ग्रुप असून 100 जवान, टीडीआरएफचे ८२
कामगार, इमॅजिकाचे 82 कामगार, सिडकोचे 460 कर्मचारी तसेच इतर सामाजिक स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनधी असे एकूण
जवळपास 1 हजार लोक काम करीत आहेत. तेथील नागरिकांना साथीच्या रोगाचा त्रास होवून यासाठी गडाच्या पायथ्याला छोटा दवाखाना उभा करण्यात आला असून इरसाळवाडी गावासाठी स्वतंत्र मदत कक्ष उभारण्यात आला आहे. तसेच जंतूनाशक फवारणीही करण्यात येत आहे.