केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री जे.पी. नड्डा यांनी सांगितले की भारताने संसर्गजन्य आजारांविरोधात मोठी प्रगती केली आहे. देशात मलेरियामुळे होणारे मृत्यू 78 टक्क्यांनी कमी झाले असून संसर्गाच्या रुग्णसंख्येत सुमारे 80 टक्क्यांची घट झाली आहे.
नवी दिल्ली येथे झालेल्या सार्वजनिक आरोग्य परिणाम मंचावर बोलताना त्यांनी सांगितले की आतापर्यंत 30,000 पेक्षा अधिक आयुष्मान आरोग्य मंदिरांना राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानक प्रमाणपत्र देण्यात आले आहे. प्रत्येक 2,000 लोकसंख्येमागे एक आरोग्य मंदिर उभारण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
टीबीच्या रुग्णसंख्येत सुमारे 30 टक्क्यांची घट झाली असून हा आकडा जागतिक सरासरीपेक्षा चांगला आहे. मातामृत्यू दर 2014 मधील प्रति लाख 130 वरून आता 88 वर आला आहे. शिशुमृत्यू दरातही घट नोंदवली गेली आहे.
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमुळे नागरिकांचा आरोग्यावरचा खर्च 69 टक्क्यांवरून 39 टक्क्यांपर्यंत कमी झाला असून लाखो कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळाला आहे.






