“धर्मसंस्थापक, शूर पराक्रमी, अन्यायाविरोधात लढणारे छत्रपती संभाजी महाराज” – हे नाव उच्चारताच डोळ्यांसमोर एक धैर्यशाली योद्धा उभा राहतो, ज्याने स्वराज्यासाठी, हिंदवी साम्राज्यासाठी आणि स्वाभिमानासाठी प्राणार्पण केले. २९ मार्च हा दिवस छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन म्हणून ओळखला जातो, कारण याच दिवशी औरंगजेबाच्या अमानुष छळाला सामोरे जात त्यांनी आपले प्राण दिले, पण धर्म आणि स्वराज्यावरची निष्ठा डगमगू दिली नाही.
संभाजी महाराजांचे जीवन आणि स्वराज्यावरील निष्ठा
छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले चिरंजीव संभाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धेच नव्हे, तर विद्वत्तेतही सर्वोच्च होते. सिंहगर्जना करणारे, रणधुरंधर सेनानी आणि कुशल प्रशासक अशी त्यांची ओळख होती. त्यांना संभाजीराजे, धर्मवीर, छत्रपती संभाजी महाराज अशा अनेक गौरवशाली नावांनी ओळखले जाते.
त्यांनी मराठा साम्राज्याचे शत्रू मुघल, पोर्तुगीज, इंग्रज, सिद्धी आणि आदिलशाही यांच्याशी लढा दिला आणि स्वराज्याच्या सीमेचा भक्कम संरक्षक म्हणून कार्य केले.
औरंगजेबाच्या अत्याचारांना दिलेले कठोर प्रत्युत्तर
छत्रपती संभाजी महाराज यांनी औरंगजेबाच्या जुलमी सत्ता स्थापनेस ठाम विरोध केला. अनेक मोहिमांमध्ये त्यांनी मुघल सैन्याचा पराभव केला आणि स्वराज्याला अधिक बळकट केले. १८ फेब्रुवारी १६८९ रोजी संगमेश्वर येथे विशवासघाताने त्यांना पकडण्यात आले.
औरंगजेबाने त्यांच्यासमोर दोन पर्याय ठेवले – इस्लाम स्वीकारा किंवा मृत्यूला सामोरे जा. पण छत्रपती संभाजी महाराजांनी मृत्यूला कवटाळणे पसंत केले, पण धर्म त्यागला नाही. ४० दिवस अमानुष छळ केल्यानंतर, २९ मार्च १६८९ रोजी तुळापूर येथे क्रूरपणे त्यांची हत्या करण्यात आली.
बलिदान दिनाचा संदेश
संभाजी महाराजांचे बलिदान आपल्याला स्वाभिमान, स्वातंत्र्य आणि निष्ठा यांचे महत्त्व शिकवते. आजही त्यांच्या विचारांवरून प्रेरणा घेऊन अन्यायाविरोधात लढण्याची गरज आहे. त्यांचा बलिदान दिन हा केवळ स्मरणाचा दिवस नसून, प्रेरणा घेण्याचा दिवस आहे.
त्यांच्या बलिदानाचा आदर म्हणून २९ मार्चला तुळापूर येथे लाखो शिवभक्त जमतात आणि त्यांना अभिवादन करतात. आपणही या दिवशी त्यांचे स्मरण करून त्यांच्या विचारांचा जागर करूया.
“जिजाऊसुत संभाजी राजे, तुमचे बलिदान अजरामर आहे!”
Image by – hindujagruti.org