News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

मुंबई: राज्य सरकारने १ मेपर्यंत रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवावा, अन्यथा संभाजी ब्रिगेड स्वतः पुढाकार घेऊन पुतळा हटवण्याची कारवाई करील, अशी चेतावणी त्यांनी दिली आहे.

२ दिवसांपूर्वी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषदेत रायगडावरील वाघ्या कुत्र्याचे शिल्प हटवण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी विरोध दर्शवला होता.

संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांनी सांगितले की, आम्ही संभाजीराजे छत्रपती यांच्या भूमिकेचे स्वागत करतो. सरकार त्यांच्या भूमिकेवर काय निर्णय घेते, याची आम्ही वाट पाहत आहोत. मराठा जोडो यात्रा संपल्यानंतर १ मे रोजी आम्ही स्वतः पुतळा हटवण्यासाठी जाणार आहोत.

यावेळी त्यांनी पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनाही आव्हान दिले. ते वाघ्या कुत्र्याला ऐतिहासिक संदर्भ असल्याचा दावा करत आहेत, पण तो आम्हाला मान्य नाही. त्यामुळे त्यांनी आमच्यासोबत चर्चेला यावे, असेही खेडेकर म्हणाले.

उल्लेखनीय म्हणजे, संभाजी ब्रिगेडने २०११ मध्ये हा पुतळा हटवला होता. मात्र त्यानंतर धनगर समाजाने तो पुन्हा बसवला होता.