नागपूर – राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठाच्‍या ‘एम्.ए.’च्‍या (पदव्‍युत्तर पदवीच्‍या) अभ्‍यासक्रमात भाजप, जनसंघ आणि रामजन्‍मभूमी आंदोलन यांचा इतिहास शिकवला जाणार आहे. हा अभ्‍यासक्रम २०२३-२४ शैक्षणिक वर्षापासून लागू होणार आहे. जनसंघ आणि भाजप यांची स्‍थापना, त्‍यांचे कार्य, विस्‍तार, विचारधारा अन् त्‍यांची राष्‍ट्रीय भूमिका आदींची सविस्‍तर मांडणी करण्‍यात आली आहे. खलिस्‍तानी चळवळीचा इतिहास वगळण्‍यात आला आहे.

नव्‍या राष्‍ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यापिठाच्‍या इतिहास अभ्‍यास मंडळाने इतिहासाच्‍या पदव्‍युत्तर अभ्‍यासक्रमाच्‍या चौथ्‍या ‘सेमिस्‍टर’च्‍या अभ्‍यासक्रमात पालट केला आहे. त्‍यात भाजपचा समावेश करण्‍यासाठी अभ्‍यासक्रमाची व्‍याप्‍ती वर्ष १९४८ ते २०१० अशी करण्‍यात आली आहे. विद्यापिठाने वर्ष २०१९ मध्‍ये कला शाखेच्‍या पदवीच्‍या अभ्‍यासक्रमात पालट केला होता. त्‍यात ‘राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे राष्‍ट्र निर्माणात योगदान’ या प्रकरणाचा समावेश करण्‍यासाठी ‘नेचर ऑफ मोडरेट पॉलिटिक्‍स’ आणि ‘राईज अँड ग्रोथ ऑफ कम्‍युनलिझम’ या २ विषयांचा इतिहास वगळण्‍यात आला होता. तेव्‍हा विविध संघटनांनी याला विरोध केला होता.

‘नवा अभ्‍यासक्रम वर्ष १९४८ ते २०१० पर्यंतचा आहे. त्‍यामुळे त्‍यात जनसंघ आणि भाजप यांचा इतिहास समाविष्‍ट करण्‍यात आला. या प्रकरणी काँग्रेसला वगळण्‍यात आलेले नाही; पण कम्‍युनिस्‍ट पक्षाला राष्‍ट्रीय पक्षाचा दर्जा नसल्‍यामुळे त्‍याला प्रकरणातून वगळले आहे. पंडित नेहरू आणि इंदिरा गांधींची भूमिका या प्रकरणांचा यात समावेश करण्‍यात आला आहे’, असे विद्यापिठाच्‍या अभ्‍यास मंडळाचे अध्‍यक्ष डॉ. श्‍याम कोरेठी यांनी सागितले.