१५ ऑगस्टपासून राज्यात रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, शॉपिंग मॉल्सला रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा मार्ग अखेर मोकळा

49

राज्यात रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, शॉपिंग मॉल्सला रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यात राज्यात सर्व ठिकाणी आता रेस्टॉरंट्स, हॉटेल्सला ५० टक्के क्षमतेनं रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी १५ ऑगस्टपासून होणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

कोरोना प्रादुर्भावाच्या तिसऱ्या लाटेचा धोका तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे याची काळजी घेण्याच्या दृष्टीनं एक महत्वाचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. राज्यात निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली असली जरी ज्या दिवशी राज्याची ऑक्सिजनची मागणी ७०० मेट्रीक टनच्या वर पोहोचे तेव्हा राज्यात लगेच कडक लॉकडाऊन जारी केला जाईल असा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असल्याचं राजेश टोपे यांनी यावेळी सांगितलं.

शॉपिंग मॉल्समध्ये दोन डोस घेतलेल्यांना परवानगी
राज्यातील शॉपिंग मॉल्सला रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली असली तरी मॉल्समध्ये कोरोना विरोधी लसीचे दोन डोस घेतलेल्या ग्राहकांनाच प्रवेशाची परवागनी देण्यात येईल, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.

मंगलकार्यालांसाठी मर्यादा वाढवली
लग्नकार्यासाठी खुल्या जागेवर २०० माणसांना तर बंद हॉलमध्ये निम्म्या क्षमतेच्या किंवा १०० माणसांपर्यंत उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे. हा निर्णय देखील १५ ऑगस्टपासून लागू होणार आहे, असं टोपे यांनी सागितलं आहे.