क्रांतीपक्षाचे उग्र आंदोलन लोकपक्षाच्या पाठीशी नसेल, तर लोकपक्ष हा शेवटी मवाळांचा मेळावा ठरून शत्रूवर योग्य तेवढे दडपण आणण्यास असमर्थ ठरतो. ही जोड जमवावीच लागते. ती जमल्याखेरीज कार्यसिद्धी होऊ शकत नाही. टिळकांच्या जवळ ही समन्वयाची दृष्टी होती. वेळप्रसंग पाहून सर्व मार्ग हाताळण्याची चतुरस्रता होती. एकीकडे ते स्पष्टपणे म्हणत, ‘‘कोणतीही चळवळ लोकांच्या अनुकूलतेखेरीज सिद्धीस जात नाही. लोक अनुकूल नसल्यास पुढारी एकटा पडतो.’’ दुसरीकडे क्रांतीकारकांना पाठीशी घालण्याचे, कृष्णाजी खाडिलकरांना नेपाळात पाठवून बाँबच्या कारखान्याच्या दृष्टीने काही हालचाल करण्याचे, सैनिकीकरणाचा जोरदार पुरस्कार करण्याचे त्यांचे उद्योगही चालूच असत. मवाळांचे वाटाघाटीचे मार्गही त्यांनी कधी वर्ज्य मानले नाहीत, तसेच वेळप्रसंगी लोकांची तशी ५० टक्के जरी सिद्धता दिसली, तरी सशस्त्र बंडाचा पर्याय दृष्टी आड केला नाही.’

– श्री. ग. माजगावकर (‘स्वातंत्र्यवीर’ दिपावली विशेषांक नोव्हेंबर- डिसेंबर २००७, पृष्ठ २२-२३)

लोकमान्य बाळ गंगाधर : (२३ जुलै १८५६–१ ऑगस्ट १९२०). थोर भारतीय नेते,भगवद्‌गीतेचे आधुनिक भाष्यकार व प्राच्यविद्या पंडित. त्यांचा जन्म रत्नागिरीस झाला. त्यांचे जन्मनाव केशव; परंतु बाळ हेच नाव पुढे रूढ झाले. टिळक कुटुंबाचे मूळ गाव चिखलगाव (ता. दापोली, जि. रतिनागिरी).

चिखलगावची खोतीदारी त्यांच्याकडे होती. पणजोबा केशवराव यांनी पेशव्यांच्या काळात मानाची जागा मिळवली होती. आजोबा रामचंद्रपंत यांनी उत्तर आयुष्यात संन्यास घेतला. टिळकांचे वडील गंगाधरपंत व आई पार्वतीबाई. गंगाधरपंतांना कौटुंबिक अडचणीमुळे इंग्रजी शिक्षण सोडून पुण्याहून गावी जावे लागले. पुढे त्यांनी मराठी शाळेत शिक्षकाची नोकरी केली. बाळ गंगाधऱ टिळकांचे पारंपरिक संस्कृत अध्ययन घरातच झाले. १८६६ मध्ये गंगाधरपंतांची बदली पुण्यास झाल्यामुळे टिळक आपल्या मातापित्यांबरोबर पुण्यास आले. पुण्यास आल्यावर थोड्याच दिवसांत टिळकांची आई मरण पावली आणि गंगाधरपंतांची बदलीही ठाण्यास झाली. तथापि पुण्यात राहूनच ते १८७२ मध्ये मॅट्रिक झाले.

तत्पूर्वी १८७१ मध्येच त्यांचा कोकणातील लाडघर गावच्या बल्लाळ बाळ कुटुंबातील सत्यभामाबाई (माहेरचे नाव तापीबाई) यांच्याशी विवाह झाला. त्यांना तीन मुली आणि विश्वनाथ, रामभाऊ व श्रीधर असे तीन मुलगे होते. त्यांचे नातू ज. श्री. टिळक हे केसरीचे विद्यमान संपादक असून खासदार आहेत.

गंगाधरपंत १८७२ मध्ये निधन पावले. मुलाच्या शिक्षणासाठी त्यांनी काही रक्कम ठेवली होती. त्यामुळे टिळकांनी डेक्कन कॉलेजमध्ये नाव घालते. महाविद्यालयातील पहिल्या वर्षी नियमित व्यायाम करून प्रकृती सुदृढ व निकोप राखण्यावर त्यांनी भर दिला. या कमावलेल्या शरीराचा पुढे दगदगीच्या राजकीय जीवनात व कारावासात त्यांना फार मोठा उपयोग झाला. १८७६ मध्ये ते बी.ए. पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. एम्. ए. मात्र होऊ शकले नाहीत. अखेर त्यांनी एल्एल्.बी. ही पदवी घेतली.

डेक्कन कॉलेजमध्येच टिळक आणि आगरकर यांचा स्नेह जमला. दोघांनी देशकार्याला वाहून घेण्याचा संकल्प केला. याच सुमारास निबंधमालाकार विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी सरकारी नोकरी सोडून शाळा काढण्याचे ठरविले होते; तेव्हा टिळक व आगरकर दोघेही त्यांना मिळाले. १ जानेवारी १८८० रोजी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली. टिळकांनी विनावेतन शिक्षकी पेशा पतकरला. चिपळूणकर, टिळक व आगरकर यांनी १८८१ मध्ये आर्यभूषण छापखाना काढला आणि केसरी (मराठी) व मराठा(इंग्रजी) ही दोन वृत्तपत्रे सुरू केली.

प्रारंभी आगरकर केसरीचे व टिळक मराठ्यांचे संपादक होते. वृत्तपत्रांच्या द्वारे लोकशिक्षण, राजकीय जागृती व शासकीय अन्यायाचा प्रतिकार हे त्यांचे ऐतिहासिक कार्य येथूनच सुरू झाले. वृत्तपत्रीय जीवनाच्या प्रारंभीच कोल्हापूर संस्थानचे दिवाण माधवराव बर्वे यांच्यावर केसरी व मराठ्यातून अनेक लेख प्रसिद्ध झाले. त्यांच्या गैरकारभारावर तसेच इंग्रज सरकारच्या छत्रपती शिवाजींसंबंधीच्या वर्तणुकीवर त्यांनी कडाडून टीका केली. त्याबद्दल टिळक व आगरकर यांना चार महिन्यांची शिक्षा होऊन डोंगरीच्या तुरुंगात ठेवण्यात आले. २६ ऑक्टोबर १८८२ रोजी त्यांची सुटका झाली.

विष्णुशास्त्री १८८२ मध्ये मरण पावले; तथापि १८८४ मध्ये वेडरबर्न, वर्ड्‌स्वर्थ, मंडलिक, तेलंग, दांडेकर, य.मो. केळकर, भांडारकर वगैरे प्रभृतींच्या मदतीने टिळक–आगरकरांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि या संस्थेतर्फे १८८५ मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली.

टिळक गणित व संस्कृत विषय शिकवीत. पुढे टिळकांचे संस्थेतील एकंदर धोरणासंबंधी मतभेद झाले. आपल्या चाळीस पानी राजीनाम्यात टिळकांनी ‘निर्वाहापुरते वेतन’ या तत्त्वाऐवजी ‘सांपत्तिक स्थितीनुसार वेतन’ तसेच ‘राष्ट्रीय शिक्षण संस्थे’च्या उद्दिष्टाविरुद्ध ‘सरकारच्या मदतीवर चालणारी संस्था’ हे धोरण संस्थेच्या मूळ धोरणाला धक्के देणारे आहे, असे आग्रहाने सांगितले. या प्रश्नावर त्यांचा आगरकरांशी वाद झाला. याशिवाय दुसरा वाद ‘आधी कोण? राजकीय की सामाजिक?’ या विषयावर झाला होता.

आगरकरांना सामाजिक सुधारणा महत्त्वाच्या वाटत होत्या आणि देश सुधारण्यासाठी किंवा स्वातंत्र्यासाठी ते सामाजिक सुधारणांना प्राधान्य देत. स्वतंत्रतेचा किंवा राष्ट्रीयत्वाचा अभिमान म्हणून जो काही जोम आहे, तो जोपर्यंत जाज्वल्य व जागृत आहे; तोपर्यंत समाजरचना कशीही असली, तरी तीतील दोष राष्ट्राच्या उन्नतीस अथवा भरभराटीस आड येत नाहीत, अशी टिळकांची भूमिका होती. स्वाभिमान, उत्साह, स्वराज्यनिष्ठा हाच राष्ट्राचा खरा आत्मा किंवा जीव आहे आणि हा जिवंतपणा जेथे वसत आहे, त्या ठिकाणी सुईच्या मागोमाग जसा दोरा तद्वतच सामाजिक सुधारणाही मागोमाग येत असतात, अशी इतिहासाची साक्ष आहे; असे ते आग्रहपूर्वक प्रतिपादीत. राष्ट्राची सामाजिक प्रगती होऊ नये, असे त्यांचे म्हणणे नव्हते; पण ती राजकीय प्रगतीच्या आणि स्वाभिमानाच्या अनुषंगानेच झाली पाहिजे.

मात्र आगरकरांची भूमिका याच्या बरोबर विरुद्ध होती. सामाजिक सुधारणेशिवाय देश स्वातंत्र्याला पात्र होणार नाही, म्हणून प्रथम समाजातील रूढी, अज्ञान, अंधश्रद्धा, पापपुण्याच्या कल्पना यांच्या पाशांतून त्याची मुक्तता झाली पाहिजे, जातिभेद नष्ट झाले पाहिजेत, असे ते निकराने मांडीत. परकीय सरकारने लोकमताची पर्वा न करता सुधारणेसाठी योग्य ते कायदे करावेत, असे आगरकरांचे मत होते. टिळकांचे म्हणणे असे होते की, ‘आमच्या सुधारणा आम्हीच करू, परकीय सत्तेची ढवळाढवळ आमच्या सामाजिक वा धार्मिक बाबतीत होऊ नये. मात्र लोकमत अनुकूल असेल आणि धर्मवचनांच्या बाबतींत तडजोड होत असेल, तर असा कायदा करण्यास आमची काही हरकत नाही ’.

या व अशा प्रकारच्या वर्णव्यवस्था, वेदोक्त प्रकरण आदी धार्मिक बाबींशी संबंध येणाऱ्‍या गोष्टींवर जे वाद झाले, त्यांसंबंधी टिळकांची भूमिका ही त्यांच्या धर्मविषयक श्रद्धेतून घडविली गेली होती, असे दिसते. टिळकांना राष्ट्राइतकाच हिंदू धर्माचाही जाज्वल्य अभिमान होता. धर्म हा त्यांच्या व्यासंगाचा विषय होता. त्यांनी वेद, उपनिषदे, तत्त्वज्ञान, धर्मशास्त्रे, गीता व आचार्याची भाष्ये यांचा अभ्यास केला होता. हिंदुत्व हे स्वत्वाचे फळ आहे असे ते मानीत. ज्यास हिंदुत्वाचा अथवा हिंदू धर्माचा अभिमान नाही, त्यास हिंदू लोकांनी काय समाजसुधारणा कराव्यात ते सांगण्याचा अधिकार नाही, असे ते म्हणत.

टिळकांनी बहुतेक मराठी स्फुटलेखन केसरीतून केले. केसरीव्यतिरिक्त काही लेखन टिळकांनी मराठा या त्यांच्या इंग्रजी वृत्तपत्रातून केले. या साप्ताहिकांच्या बाहेर टिळकांनी केलेले स्फुटलेखन फार थोडे आहे. त्यात उल्लेखनीय म्हणजे लिमयेकृत भारतीय युद्ध, अवंतिकाबाई गोखलेकृत गांधीचरित्र व डॉ. गर्देकृत ईशगुणादर्श या पुस्तकांच्या प्रस्तावना होत.

टिळकांचा संस्कृत व इंग्रजी वाङ्‌मयाचा गाढा अभ्यास होता. भारतीय तत्त्वज्ञान हा त्यांचा आवडीचा विषय. त्यांनी पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचेही अध्ययन केले होते. त्यांच्या व्यापक व्यासंगाचे उत्कृष्ट प्रतिबिंब गीतारहस्यात पहावयास मिळते.

राजकीय क्षेत्रात टिळक काम करीत असताना कधी तुरुंगात व अन्य वेळी त्यांना थोडीशी उसंत मिळाली, त्या काळात त्यांनी काही ग्रंथ लिहिले. बहुतेक त्यांचे लेखन संशोधनपर असून प्रत्येक ग्रंथात त्यांनी काही स्वतंत्र मते प्रतिपादन केली आहेत. त्यांचे प्रमुख ग्रंथगीतारहस्य, ओरायन, आर्क्टिक होम इन द वेदाज आणि वेदांगज्योतिष.

मंडालेच्या तुरुंगात टिळकांनी श्रीमद्‌भगवद्‌गीतारहस्य अथवा कर्मयोगशास्त्र हा ग्रंथ १९१०–११ च्या हिवाळ्यात लिहिला व १९१५ मध्ये प्रसिद्ध केला. हा ग्रंथ म्हणजे गीतेवरचे भाष्य असून ते कर्मयोगपर आहे. तत्पूर्वी सर्व भाष्ये व टीका बाजूला ठेवून नुसते गीतेचेच स्वतंत्रपणे पारायण करून टिळकांना गीतेचा जो बोध झाला, तो त्यांनी यात विवेचकपणे प्रतिपादन केला आहे. त्यांच्या मते गीता निवृत्तिपर नसून ती प्रवृत्तिपर आहे.

ओरायन हा एक त्यांचा संशोधनात्मक प्रबंध आहे. १८९२ च्या लंडन येथील ओरिएंटल परिषदेसाठी त्यांनी तो तयार केला. त्यात वेदाचा कालनिर्णय हा विषय हाताळला. माक्स म्यूलरने जो वेदांचा काळ ठरविला तो भाषिक संशोधनावर ठरविला असल्याने तो बरोबर नाही; संशोधनाची ही पद्धत एकांगी होय, असे टिळकांचे मत होते. म्हणून त्यांनी दैवतशास्त्र, भाषाशास्त्र, संहिता आणि ब्राह्मणे यांतील ज्योतिषशास्त्रविषयक सर्व संदर्भ एकत्रित करून ज्योतिषाच्या गणिताने वेदांचा काळ सु. इ. स. पू. ४५०० वर्षे हा ठरविला. या ग्रंथाची याकोबी व ब्लूमफील्ड या पाश्चात्त्य प्राच्यविद्या पंडितांनी स्तुती केली आहे.

आर्क्टिक होम इन द वेदाज हाही टिळकांचा एक संशोधनपर प्रबंध असून १८९८ साली टिळक येरवड्याच्या तुरुंगात असताना त्याची कल्पना त्यांना सुचली. या पुस्तकात त्यांनी आर्यांचे मूलस्थान उत्तर ध्रुवाच्या प्रदेशातच असले पाहिजे, हे अनुमान मुख्यतः वेदांतील ऋचांच्या आधारे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

आपल्या गीतारहस्यातून ज्या कर्मयोगाचा पुरस्कार टिळकांनी केला, तोच कर्मयोग प्रत्यक्ष जीवनात आचरून दाखविला. लोकसंग्रहाची दृष्टी राखून लोकमान्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीला समाजाच्या सर्व थरांतील लोकांचे अधिष्ठान मिळवून दिले. गीतारहस्य हे त्यांचे अक्षय विचारधन असून ते आधुनिक भारतातील एक श्रेष्ठ तत्त्वज्ञान होय. गांधींच्या सर्वांगीण व सर्वंकष राजकीय-सांस्कृतिक कार्याला अनुकूल अशी पार्श्वभूमी निर्माण करण्याचे श्रेय लोकमान्यांना द्यावे लागते. म्हणून आधुनिक भारताच्या इतिहासात टिळकयुग हा फार महत्त्वाचा टप्पा मानण्यात येतो.

संदर्भ – https://mr.vikaspedia.in/education/childrens-corner/92d93e93092494092f-90792493f93993e938/93294b91592e93e92894d92f-91f93f933915