News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र अर्थात इयत्ता 10 वी परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची घोषणा केली आहे. राज्यातील पुणे, नागपूर, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आली होती.

विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र एसएससी निकाल 2026 शुक्रवार, 8 मे 2026 रोजी 11.30 AM वाजल्यापासून ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयनिहाय गुणांची माहिती अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येणार असून गुणपत्रिकेची प्रिंट देखील काढता येईल.

निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना खालील अधिकृत संकेतस्थळांचा वापर करता येणार आहे :

  • results.digilocker.gov.in
  • mahahsscboard.in
  • sscresult.mkcl.org
  • results.targetpublications.org
  • results.navneet.com
  • tv9marathi.com
  • education.indianexpress.com

याशिवाय विद्यार्थ्यांना Digilocker App मध्ये डिजिटल गुणपत्रिका सुरक्षित स्वरूपात संग्रहित करून ठेवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शाळांना त्यांच्या संस्थेचा एकत्रित निकाल पाहण्यासाठी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरील school login सुविधा वापरता येणार आहे.

गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी ऑनलाईन अर्ज

निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना कोणत्याही अनिवार्य विषयातील गुणांची पडताळणी करण्यासाठी तसेच उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. यासाठी विद्यार्थी स्वतः किंवा संबंधित शाळेमार्फत अर्ज सादर करू शकतात.

गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकेच्या प्रतीसाठी अर्ज प्रक्रिया 9 मे 2026 ते 23 मे 2026 या कालावधीत सुरू राहणार आहे. अर्जासोबत आवश्यक शुल्क Debit Card, Credit Card, UPI किंवा Net Banking च्या माध्यमातून भरता येईल.

पुनर्मूल्यांकनासाठी महत्त्वाची अट

उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. छायाप्रत मिळाल्यानंतर पाच कार्यालयीन दिवसांच्या आत संबंधित विभागीय मंडळाकडे विहित शुल्कासह ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.

पुनर्मूल्यांकन प्रक्रियेबाबत अधिक माहिती विद्यार्थ्यांना त्यांच्या विभागीय मंडळाकडून मिळू शकणार आहे.

श्रेणी सुधार योजना विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध

फेब्रुवारी-मार्च 2026 च्या परीक्षेत सर्व विषयांसह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधार योजनेअंतर्गत पुढील तीन संधी दिल्या जाणार आहेत. या संधी जून-जुलै 2026, फेब्रुवारी-मार्च 2027 आणि जून-जुलै 2027 या परीक्षा सत्रांमध्ये उपलब्ध राहतील.

पुरवणी परीक्षेसाठी स्वतंत्र अर्ज प्रक्रिया

जून-जुलै 2026 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता 10 वी पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी, श्रेणी सुधार इच्छुक तसेच खाजगीरित्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. यासंदर्भातील स्वतंत्र परिपत्रक लवकरच मंडळाकडून प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.