भारतीय संस्कृतीत नद्यांना अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे स्थान आहे. नद्या या केवळ पाण्याचा स्रोत नसून देशाच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक परंपरांचे प्रतीक आहेत. त्यामुळे नदी संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन देशाचे माजी राष्ट्रपती Ram Nath Kovind यांनी केले.
नाशिकमध्ये ‘रामतीर्थ गोदावरी सेवा समिती’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘गोदावरी महाआरती’ कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी त्यांनी भारतीय संस्कृतीतील ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ आणि ‘वसुधैव कुटुंबकम्’ या संकल्पनांचा उल्लेख करत राष्ट्रीय एकात्मता अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले.
माजी राष्ट्रपती कोविंद यांनी नाशिकच्या धार्मिक आणि ऐतिहासिक वारशाचे कौतुक केले. प्रभू श्रीराम, पंचवटी आणि गोदावरी नदीमुळे नाशिकला देशभरात विशेष ओळख मिळाल्याचे त्यांनी सांगितले. नाशिक ही केवळ धार्मिक नगरी नसून आध्यात्मिक प्रेरणा देणारे केंद्र असल्याचेही त्यांनी नमूद केले.
गोदावरी महाआरतीसारख्या उपक्रमांमुळे समाजात नदी स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जागृतीचा सकारात्मक संदेश पोहोचत असल्याचे कोविंद यांनी सांगितले. वाढते प्रदूषण आणि बदलते पर्यावरणीय संतुलन लक्षात घेता नद्यांचे जतन करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
देशात शांतता, समृद्धी, सौहार्द आणि बंधुभाव कायम राहावा, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी गोदावरी सेवा समितीच्या कार्याचे विशेष कौतुक केले. समाजहितासाठी सुरू असलेल्या या उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती वाढण्यास मदत होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमादरम्यान माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सपत्नीक गोदावरी नदीची पूजा केली. यावेळी अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.













