News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

पंढरपूर, १३ मार्च – येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन १५ मार्चपासून बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. अनुमाने दीड महीने श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन बंद रहाणार आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासमवेत झालेल्या मंदिर समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी यासंदर्भात माहिती दिली.

प्रतिदिन सहस्रोंच्या संख्येने भाविक श्री विठ्ठल-रुिक्मणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला येत असतात. सध्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे संवर्धन आणि सुशोभीकरणाचे काम चालू आहे. यासाठी राज्य सरकारने ७३ कोटी रुपये संमत केले आहेत. आता देवाच्या गर्भगृहातील काम चालू करण्यासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणीचे पुढील दीड महीने पदस्पर्श दर्शन बंद ठेवावे लागणार आहे. यासंदर्भात १२ मार्च या दिवशी मंदिर समितीची बैठक झाली. त्यामध्ये हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

या निर्णयानुसार १५ मार्चपासून पहाटे ५ ते सकाळी १०.४५ वाजेपर्यंत भाविकांना मुखदर्शन घेता येणार आहे; मात्र प्रतिदिन केले जाणारे देवाचे नित्योपचार चालू रहाणार आहेत. या कालावधीत श्री विठ्ठलाच्या मूर्तीचे संरक्षण व्हावे, यासाठी ‘बुलेटप्रूफ काचे’चे आवरण बसवण्यात येणार आहे. भाविकांनी याची नोंद घ्यावी, तसेच सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.