News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

मुंबई – १३ मार्च या दिवशी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये मुंबईतील ८ ब्रिटीशकालीन रेल्वेस्थानकांचे नामांतर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या मंत्रीमंडळाच्या बैठकीत एकूण २८ निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यामध्ये करी रोड रेल्वेस्थानकाचे नाव ‘लालबाग’, मरीन लाईन्स रेल्वेस्थानकाचे नाव ‘मुंबादेवी’, चर्नी रोड रेल्वेस्थानकाचे नाव ‘गिरगाव’, कॉटन ग्रीन रेल्वेस्थानकाचे नाव ‘काळाचौकी’, हार्बर रेल्वेमार्गावरील ‘सँडहर्स्ट रोड रेल्वेस्थानकाचे नाव ‘डोंगरी’, डॉकीयार्ड रेल्वेस्थानकाचे नाव ‘माझगाव’, किंग्ज सर्कल रेल्वेस्थानकाचे नाव ‘तीर्थंकर पार्श्वनाथ’ अशी करण्यात आली आहेत.

मंत्रीमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय !

१. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील उपसा सिंचन योजनेस मान्यता देण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या योजनेमुळे ३५ गावांना लाभ होणार आहे.

२. शासनाच्या पशूसंवर्धन आणि दुग्धविकास विभाग यांच्या एकत्रिकरणाचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. यापुढे या विभागाचे नामकरण ‘आयुक्त, पशूसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय’ असे असणार आहे.

३. राज्यातील शासकीय वैद्यकीय, दंत, आयुर्वेद महाविद्यालयामधील मानसेवा (निकत) अध्यापकांचे मानधन ३० सहस्र रुपये, तर सहयोगी प्राध्यापकांचे मानधन २५ सहस्र रुपये पर्यंत वाढवण्यात आले आहे.

४. महानंद दूध संघाची स्थिती सुधारण्यासाठी येत्या ५ वर्षांसाठी या संघाचे व्यवस्थापन राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाकडे व्यवस्थापनाकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला.

५. पोलिसांचे मानधन १५ सहस्र रुपये इतके करण्यात आले आहे. यापूर्वी पोलीस पाटलांचे मानधन ६ सहस्र ५०० रुपये इतके होते. मानधन वाढीचा लाभ राज्यातील ३८ सहस्र ७२५ पोलीस पाटलांना याचा लाभ मिळणार आहे.