israel-MP
इस्रायली खासदार शेरीन हेस्कल

तेल अवीव (इस्रायल) – इस्रायली संसदेमध्ये (Israeli Parliament) एका महिला खासदाराला भाषण करण्यापासून रोखण्यात आले. शेरीन हेस्कल असे या महिला खासदाराचे नाव आहे. भाषणाच्या वेळी त्यांच्या कडेवर त्यांची नवजात मुलगी होती. भाषण करू न देण्यामागील कारण सांगतांना संसदेच्या उपसभापतींनी सांगितले की, संसदेच्या व्यासपिठावर केवळ खासदारच उपस्थित राहू शकतात, त्यांच्यासमवेत कुणीही नसावे. या नियमामुळे शेरीन यांना त्यांचे म्हणणे संसदेसमोर मांडता आले नाही. शेरीन या विरोधी पक्षांपैकी राष्ट्रीय एकता पक्षाच्या खासदार आहेत. शेरीन यांना एक विधेयक आणायचे होते आणि त्यासाठी त्यांनी आधीच नोटीस दिली होती. या घटनेवरून इस्रायली प्रसारमाध्यमांमध्ये पुष्कळ चर्चा होत आहे.

या घटनेमुळे संतप्त झालेल्या शेरीन यांनी एक वक्तव्य प्रसारित करत म्हटले आहे की, संसदेच्या अध्यक्षांनी विचार करावा की, त्यांनाही दोन मुले आहेत. त्यांना नियमांच्या नावाखाली खासदाराला भाषण करण्यापासून रोखण्याचा अधिकार आहे का ? महिला खासदार मुलासह भाषण करू शकत नाही, असे कुठे लिहिले आहे ते सांगा.