भारत आणि सेशेल्स यांच्यातील द्विपक्षीय संबंधांना नवसंजीवनी देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेशेल्सचे राष्ट्रपती डॉ. पॅट्रिक अर्मिनी यांच्या भारत दौऱ्यादरम्यान संयुक्त पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण घोषणा केली. दोन्ही देशांमधील सहकार्य पुढील टप्प्यात नेण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
राष्ट्रपती अर्मिनी यांच्या भारतातील या पहिल्याच अधिकृत भेटीचे स्वागत करत पंतप्रधानांनी सांगितले की, हा दौरा दोन्ही देशांसाठी विशेष महत्त्वाचा आहे, कारण सेशेल्सच्या स्वातंत्र्याच्या ५०व्या वर्षासोबतच भारत–सेशेल्स राजनैतिक संबंधांनाही ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक टप्प्यामुळे परस्पर सहकार्याला नवी प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भारत आणि सेशेल्स यांचे संबंध केवळ राजनैतिक पातळीपुरते मर्यादित नसून हिंद महासागराने शतकानुशतके दोन्ही देशांना व्यापार, संस्कृती आणि लोकांमधील नात्यांद्वारे जोडून ठेवले आहे. भविष्यातील सहकार्याचाही हा पाया अधिक मजबूत करण्यावर दोन्ही देशांनी भर दिला.
बैठकीदरम्यान आर्थिक सहकार्य वाढवण्यावर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली. स्थानिक चलनांमध्ये व्यापार वाढवणे, तसेच फिनटेक आणि डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्याचा विस्तार करणे यावर चर्चा झाली.
भारताने सेशेल्सच्या विकास प्राधान्यांना पाठिंबा देण्यासाठी १७५ दशलक्ष डॉलर्सचे विशेष आर्थिक पॅकेज जाहीर केले. या निधीद्वारे सामाजिक गृहनिर्माण, ई-मोबिलिटी, व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण, आरोग्य सुविधा, संरक्षण व्यवस्था आणि सागरी सुरक्षेसंबंधी प्रकल्पांना गती दिली जाणार आहे. या उपक्रमांमुळे विशेषतः युवकांसाठी रोजगार आणि कौशल्य विकासाच्या संधी वाढतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
सेशेल्समधील प्रशासनिक अधिकाऱ्यांच्या क्षमतावृद्धीसाठी भारताच्या ITEC कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षणाला चालना देण्यासाठी दोन्ही देशांत सामंजस्य करारही करण्यात आला. तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यासाठी डिजिटल परिवर्तनावर आधारित करारावरही स्वाक्षऱ्या झाल्या असून भारतातील डिजिटल यशोगाथा सेशेल्ससोबत शेअर करण्यात येणार आहे.
आरोग्य क्षेत्रातही भारत सेशेल्सचा विश्वसनीय भागीदार राहिला असून परवडणारी आणि दर्जेदार औषधे, वैद्यकीय पर्यटन आणि आरोग्य पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी दोन्ही देश सहकार्य वाढवतील. त्याचबरोबर हवामान बदल आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने अक्षय ऊर्जा आणि हवामान अनुकूल उपायांवर संयुक्त प्रयत्न वाढवण्याचेही ठरले.
हिंद महासागरातील सागरी शेजारी म्हणून ब्लू इकॉनॉमी दोन्ही देशांसाठी महत्त्वाची ठरत असून समुद्री संशोधन, माहिती देवाणघेवाण आणि क्षमतावृद्धी क्षेत्रात भारताचे अनुभव सेशेल्सला उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
सागरी सुरक्षा आणि संरक्षण सहकार्य हे दोन्ही देशांच्या संबंधांचे महत्त्वाचे आधारस्तंभ असल्याचेही अधोरेखित करण्यात आले. कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्हमध्ये सेशेल्सच्या पूर्ण सदस्यत्वाचे स्वागत करत हिंद महासागरातील शांतता आणि स्थैर्य टिकवण्यासाठी संयुक्त प्रयत्न अधिक बळकट होतील, असे सांगण्यात आले.
दोन्ही देशांतील लोकांमधील संबंध हे या भागीदारीचे सर्वात मजबूत अंग असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. सेशेल्समधील भारतीय वंशाच्या समुदायाने तेथील सामाजिक आणि आर्थिक विकासात मोठे योगदान दिले आहे. पर्यटन, शिक्षण, संस्कृती आणि क्रीडा क्षेत्रातील देवाणघेवाण वाढवून युवकांमधील संवाद अधिक दृढ करण्यावर भर देण्यात आला.
बैठकीदरम्यान भारत–सेशेल्स संयुक्त दृष्टीपत्र (Joint Vision) जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला असून आगामी काळातील सहकार्याचा मार्गदर्शक आराखडा म्हणून ते काम करेल.
शेवटी, राष्ट्रपती अर्मिनी यांच्या भारत भेटीबद्दल आणि दोन्ही देशांमधील मैत्री अधिक दृढ करण्यासाठी त्यांनी दाखवलेल्या वचनबद्धतेबद्दल पंतप्रधानांनी आभार व्यक्त केले. भारत आणि सेशेल्स यांचे सहकार्य आगामी काळात अधिक व्यापक आणि परिणामकारक होईल, असा विश्वास दोन्ही बाजूंनी व्यक्त करण्यात आला.
संदर्भ – pib प्रेस नोट











