कुन्नूर (तमिळनाडू) येथे सैन्याचे हेलिकॉप्टर कोसळून ‘सी.डी.एस्.’ जनरल बिपीन रावत यांच्यासह १३ जणांचा मृत्यू

25

कुन्नुर (तमिळनाडू) – भारताच्या तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख असलेले जनरल बिपिन रावत यांना घेऊन जाणारे सैन्याचे ‘एम्.आय. १७ व्ही ५’ हे अत्याधुनिक हेलिकॉप्टर येथील नीलगिरीच्या डोंगरावर कोसळून त्याला आग लागल्याने त्यातील रावत यांच्यासह १३ जणांचा मृत्यू झाला. यात रावत यांच्या पत्नीचाही समावेश आहे. या अपघातात ४ जण घायाळ झाले होते. त्यांच्यावर घटनास्थळापासून ९ किलोमीटर अंतरावर असणार्‍या वेलिंग्टन सैन्यतळावरील रुग्णालयात उपचार चालू असतांना त्यांतील तिघांचा मृत्यू झाला. एकावर अद्याप उपचार चालू आहेत. बिपीन रावत हे वेलिंग्टनच्या ‘डिफेंस स्टाफ कॉलेज’मध्ये जात होते. मृत्यू झालेल्यांचे मृतदेह आगीमुळे ८० टक्के होरपळले असून त्यांची ओळख पटवणे अवघड झाले आहे. त्यामुळे त्यांची ‘डी.एन्.ए.’ चाचणी करून ओळख पटवण्यात येणार आहे.

हेलिकॉप्टर तमिळनाडूतील सुलूर येथून कुन्नुर येथे जात असतांना दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी हा अपघात झाला. या अपघातामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी वाईट हवामान आणि धुके यांमुळे ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. सैन्याकडून या अपघाताची चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला आहे. या अपघाताविषयी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उद्या, ९ डिसेंबर या दिवशी संसदेत अधिकृत माहिती देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी जनरल बिपीन रावत यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.

जनरल बिपिन रावत हे देशाचे पहिले ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ (तिन्ही सैन्यदलांचा प्रमुख) !

जनरल बिपिन रावत हे देशाचे पहिले ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ होते. त्यांनी १ जानेवारी २०२० या दिवशी हे पद स्वीकारले. जनरल रावत यांनी ३१ डिसेंबर २०१६ ते ३१ डिसेंबर २०१९ या काळात सैन्यदलप्रमुखपद भूषवले होते. त्यांच्या सैन्यदलप्रमुख पदाच्या काळातच पाकमध्ये ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्यात आला होता.

बिपीन रावत यांचा जन्म १६ मार्च १९५८ मध्ये डेहराडून येथे झाला होता. रावत यांचे वडील एल्.एस्. रावत हेही लेफ्टनंट जनरल होते. बिपीन रावत यांचे प्राथमिक शिक्षण शिमल्यातील ‘सेंट एडवर्ड स्कूल’मध्ये झाले. त्यानंतर बिपीन रावत यांनी ‘इंडियन मिलिटरी अकादमी’मध्ये प्रवेश घेतला. या अकादमीतील त्यांना ‘स्वार्ड ऑफ ऑनर’ हे पहिले सन्मानपत्र मिळाले. त्यानंतर बिपीन रावत यांनी अमेरिकेत ‘सर्व्हिस स्टाफ कॉलेज’मध्ये पदवी प्राप्त केली. अमेरिकेतून भारतात परतल्यानंतर ते सैन्यात भरती झाले. त्यांची भारतीय सैन्याच्या ‘गोरखा रायफल्स’च्या पाचव्या बटालियनमध्ये पहिल्यांदा नेमणूक करण्याच आली. त्यांनी सैन्याच्या अनेक पदांवर काम केले. या काळात बिपीन रावत यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. यात परम विशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक, अतीविशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक आणि सेना पदक यांचा समावेश आहे.