मुंबई – भाजपच्या विरोधात एकवटलेल्या देशातील विविध राजकीय पक्षांच्या ‘इंडिया आघाडी’ची बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर या दिवशी मुंबईतील ‘ग्रँड हयात’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली. या बैठकीतील एका जेवणाच्या ताटलीची रक्कम साडेचार सहस्र रुपये, ६५ खुर्च्यांचे ४५ सहस्र रुपये, तर एका खोलीचे भाडे २५ ते ३० सहस्र रुपये इतके आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ३१ ऑगस्ट या दिवशी पत्रकार परिषदेत दिली. या बैठकीसाठी कोट्यवधी रुपये व्यय करण्यात असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.

उदय सामंत पुढे म्हणाले, ‘‘आम्ही गौहत्ती (गुवाहाटी) येथे गेलो होतो, त्या वेळी आमच्या हॉटेलचा व्यय सर्वांना सांगण्यात आला. जे दोन दिवसांसाठी कोट्यवधी रुपये व्यय करतात, त्यांना आमच्यावर बोलण्याचा अधिकार नाही. इंडिया आघाडीची ही बैठक म्हणजे असंतुष्टांचा मेळावा आहे. देशाच्या नावाचा वापर राजकारणासाठी करणे दुर्दैवी आहे. लोकसभा निवडणुका झाल्यावर ही आघाडी संपुष्टात येईल. ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका केली, त्यांतील अनेक पक्षांचा समावेश या आघाडीत आहे. हॉटेलकडे देण्यात आलेल्या सूचीत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष २६ व्या स्थानावर, तर शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष २५ व्या स्थानी आहे.’’