मुंबईमध्ये बनावट सीमकार्ड बनवणारी यंत्रणा कार्यरत, १३ जणांना अटक

4

मुंबई – मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात बनावट सीमकार्ड सिद्ध करणारी यंत्रणा कार्यरत आहे. आतापर्यंत बनावट सीमकार्ड सिद्ध करणार्‍या १३ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. समाज आणि राष्ट्र विघातक कामांसाठी बनावट सीमकार्डचा उपयोग होत असल्यामुळे पोलिसांकडून युद्धपातळीवर त्यांचा शोध चालू आहे. केवळ मुंबईमध्ये ३० सहस्रांहून अधिक बनावट सीमकार्ड असल्याचे अनुमान दूरसंचार विभागाकडून व्यक्त करण्यात आले आहे.

केंद्रीय गृहविभागाकडून राष्ट्रीय पातळीवर बनावट सीमकार्डचा शोध चालू आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतही शोधकार्य चालू आहे.देशपातळीवर आतापर्यंत २० लाख बनावट सीमकार्ड सापडली असून ती रहित करण्यात आली आहेत. याविषयी अधिक माहिती देतांना संयुक्त पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी दूरसंचार विभागाडून संदिग्ध सीमकार्डची माहिती पोलिसांना दिली आहे. या माहितीच्या आधारे वल्लभभाई पटेल मार्ग, मलबार हिल, डी.बी. मार्ग, सहार आणि बांगूरनगर पोलीस ठाणे या ५ पोलीस ठाण्यांचे साहाय्य घेऊन शोध चालू करण्यात आला असल्याचे सांगितले.

पोलिसांच्या अन्वेषणात मुंबईतील ६२ व्यक्तींच्या नावे ८ सहस्र ५०० बनावट सीमकार्ड आढळून आली आहेत. यामध्ये बनावट सीमकार्डसाठी संकेतस्थळावर उपलब्ध व्यक्तींच्या छायाचित्रांचा उपयोग करण्यात येत असल्याचे अन्वेषणात आढळून आले. वल्लभभाई पटेल मार्ग पोलीस ठाण्यातील पोलिसांनी विशाल शिंदे नावाच्या व्यक्तीला अटक केली असून त्याच्याकडे ३७८ सीमकार्ड मिळाली. डी.बी. मार्ग पोलीस ठाण्यातील पोलिसांनी अटक केलेल्या अब्दुल शेख याच्याकडे १९०, तर मलबार हिल येथील पोलिसांनी पकडलेल्या अब्दुल मंसूरी याच्याकडे ६८५ बनावट सीमकार्ड आढळली. पोलिसांची ही शोधमोहीम चालू आहे.

image by freepik