पृथ्वीमुळे चंद्रावर पाणी निर्माण होत आहे

6

वॉशिंग्टन (अमेरिका) – पृथ्वीवरील उच्च ऊर्जा असलेले ‘इलेक्ट्रॉन’ (सूक्ष्म कण) चंद्रावर पाणी निर्माण करत आहेत. हे इलेक्ट्रॉन पृथ्वीच्या ‘प्लाझ्मा शीट’मध्ये (सूक्ष्म कणांच्या आवरणामध्ये) आहेत, त्यांच्यामुळे पृथ्वीच्या हवामानात पालट होतात, असा दावा अमेरिकेच्या हवाई विश्‍वविद्यालयातील शास्त्रज्ञांनी भारताच्या ‘चंद्रयान-१’ने पाठवलेल्या माहितीचा अभ्यास करून केला आहे. ‘नेचर अ‍ॅस्ट्रॉनॉमी’ जर्नलमध्ये हा अभ्यास प्रकाशित करण्यात आला आहे.

या शास्त्रज्ञांचा दावा आहे की, हे इलेक्ट्रॉन चंद्रावर असलेले खडक आणि खनिजे विरघळवत आहेत. त्यामुळे चंद्राचे हवामानही पालटत आहे. या इलेक्ट्रॉन्समुळे चंद्रावर पाणी निर्माण होण्यास साहाय्य झाले असावे. चंद्रावर १४ दिवस रात्र आणि १४ दिवस सूर्यप्रकाश असतो. जेव्हा येथे सूर्यप्रकाश नसतो, तेव्हा सौर वार्‍याचा वर्षाव होतो. याच काळात पाण्याची निर्मिती झाल्याचा दावा केला जातो.

वर्ष २००८ मध्ये ‘चंद्रयान-१’ प्रक्षेपित करण्यात आले होते. या यानाने पाठवलेल्या माहितीवरून चंद्रावर बर्फ असल्याचे सिद्ध झाले होते. चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात सूर्यप्रकाश पोचत नसल्यामुळे तेथील तापमान उणे २०० अंश सेल्सिअसपेक्षा अल्प असू शकते, जे बर्फाच्या रूपात पाण्याचे अस्तित्व दर्शवते, असा अंदाज शास्त्रज्ञांनी लावला. त्यानंतर तेथील पाण्याचा शोध घेण्यासाठी ‘चंद्रयान-३’ पाठवण्यात आले.