मराठ्यांची विजयगाथा दाखवणारा ‘बलोच’ मराठी चित्रपट (‘Baloch’ Marathi movie) सर्व शाळांत दाखवण्‍यास शासनाची अनुमती

13

मुंबई, – इतिहासात सीमेपार लढलेल्‍या मराठ्यांचे असीम धैर्य, शौर्य आणि कर्तृत्‍व यांचा रणसंग्राम असलेला ‘बलोच’ (‘Baloch’ Marathi movie) हा ऐतिहासिकदृष्‍ट्या चांगल्‍या प्रकारे मांडणीद्वारे निर्मित केलेला मराठी चित्रपट आहे. त्‍यामुळे हा चित्रपट राज्‍यातील शाळांमधून दाखवण्‍यास शासनाची अनुमती मिळावी, अशी विनंती दिग्‍दर्शक श्री. प्रकाश जनार्दन पवार, विश्‍वगुंज पिक्चर्स, पुणे यांनी २३ जून या दिवशी एका पत्राद्वारे केली होती. त्‍यानुसार शासनाने काही अटींवर हा चित्रपट शाळेत दाखवण्‍यास अनुमती दिली आहे. शासनाने तसा अध्‍यादेश नुकताच काढला आहे.

‘बलोच’ मराठी चित्रपट शाळेत दाखवण्‍याविषयी शासनाने नियुक्‍त केलेल्‍या गठीत परिक्षण समितीचा अहवाल प्राप्‍त झाला आहे. राज्‍यातील शाळांमध्‍ये हा चित्रपट दाखवल्‍यास इतिहासात सीमेपार लढलेल्‍या मराठ्यांची विजयगाथा या माध्‍यमातून विद्यार्थ्‍यांना अनुभवता येणार आहे. सदर मराठी चित्रपट विद्यार्थ्‍यांना दाखवण्‍यास खालील अटी आणि शर्ती यांच्‍या अधीन राहून शैक्षणिक वर्ष वर्ष २०२३-२४ या १ वर्षासाठी अनुमती देण्‍यात आली आहे.

चित्रपट दाखवण्‍याच्‍या अटी अशा…

१. ‘बलोच’ हा चित्रपट राज्‍यातील शाळांमधील केवळ १० वर्षे वयोगटांपुढील विद्यार्थ्‍यांनाच दाखवण्‍यात यावा.

२. हा चित्रपट पहाण्‍याची कोणत्‍याही विद्यार्थ्‍यांना सक्‍ती करू नये.

३. विद्यार्थ्‍यांच्‍या शैक्षणिक अभ्‍यासक्रमात कोणताही अडथळा येणार नाही, याची योग्‍य ती दक्षता घेण्‍यात यावी.

४. शासन अनुमतीच्‍या आधारे हा चित्रपट दाखवण्‍याविषयी इतर दुसर्‍या कोणत्‍याही संस्‍थेसमवेत निर्माता, विश्‍वगंज पिक्चर्स, पुणे यांना करार करता येणार नाही किंवा प्रतिनिधी नेमता येणार नाही. तशी अनुमती त्‍यांना रहाणार नाही.

५. हा चित्रपट पहाण्‍यास इच्‍छुक विद्यार्थ्‍यांकडून २० रुपयांहून अधिक शुल्‍क आकारता येणार नाही.