News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

पणजी (गोवा) (वार्ता.) – काश्मीरमध्ये हिंदूंवर झालेल्या अनन्वित अत्याचारांना ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने विश्‍वभरात वाचा फोडली. त्यानंतर ‘द केरल स्टोरी’ चित्रपटातून ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून हिंदु मुलींना धर्मांतरित करून त्यांचा जिहादी आतंकवादासाठी केल्या जाणार्‍या वापराविषयीचे षड्यंत्र मांडण्यात आले. गोव्यातही पोर्तुगिजांनी ‘इन्क्विझिशन’च्या (धर्मच्छळाच्या) नावाखाली जनतेवर केलेले अमानवीय अत्याचार संपूर्ण देशाला कळणे आवश्यक आहे. गोव्याचा खरा इतिहास समजून घेणे, हा जनतेचा मूलभूत अधिकार आहे. ख्रिस्ती धर्मगुरु पोप हे विश्‍वभरात अनेक ठिकाणी जाऊन ख्रिस्त्यांकडून झालेल्या अमानुष अत्याचारांची जाहीर क्षमा मागत असतात. तशी क्षमा गोव्यातील जनतेची त्यांनी आतापर्यंत का मागितली नाही ? गोव्याचा तो काळा इतिहास अधिक काळ जनतेपासून लपवून ठेवता येणार नाही.

‘कश्मीर फाइल्स’प्रमाणे ‘गोवा फाइल्स’वरही चर्चा व्हावी, तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेच्या आंदोलनाला गती मिळावी, यासाठी प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही १६ ते २२ जून या कालावधीत ‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथे एकादश ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ अर्थात् ‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.