News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

मुंबई : महाराष्ट्रातील शालेय शिक्षण व्यवस्थेत आगामी शैक्षणिक सत्रापासून महत्त्वपूर्ण बदल पाहायला मिळणार आहेत. राज्य सरकारकडून इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीसाठी नवीन अभ्यासक्रम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जून महिन्यापासून सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षात हा बदल अमलात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या कार्यालयात मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत इयत्ता सहावीच्या अभ्यासक्रम आराखड्याला अधिकृत मंजुरी देण्यात आली. यापूर्वी दुसरी, तिसरी आणि चौथीच्या अभ्यासक्रमाबाबतही निर्णय घेण्यात आला होता.

राज्य सरकारकडून तयार करण्यात आलेला हा अभ्यासक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीवर आधारित शिक्षण पद्धती विकसित करण्यावर यामध्ये भर देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांची काठिण्यपातळी लक्षात घेऊन अभ्यासक्रमाची मांडणी करण्यात आली असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले की, नव्या अभ्यासक्रमाच्या प्रारूपाला राज्य सुकाणू समितीकडून संमती देण्यात आली आहे. त्यानंतर अभ्यासक्रम समन्वय समितीकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर नवीन पाठ्यपुस्तके तयार करण्याचे काम तातडीने सुरू होणार आहे.

विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रमानुसार पुस्तके वेळेत मिळावीत यासाठी बालभारती कडून आवश्यक तयारी सुरू करण्यात येणार आहे. आगामी शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीलाच ही नवीन पुस्तके उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचेही सांगण्यात आले.

राज्यातील शिक्षण व्यवस्थेत गुणवत्तापूर्ण आणि कौशल्याधारित शिक्षणाला चालना देण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. नवीन अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या समज, कौशल्य आणि अध्ययन क्षमतेत वाढ होण्याची अपेक्षा शिक्षण विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.