देशभरात नुकतीच पार पडलेल्या NEET Exam नंतर परीक्षा केंद्रांवरील सुरक्षा आणि तपासणी प्रक्रियेबाबत मोठा वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही व्हिडिओंमुळे विद्यार्थ्यांच्या तपासणीतील नियम, धार्मिक प्रतीकांचा वापर आणि सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
यंदा ३ मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या नीट परीक्षेला देशभरातून सुमारे २० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. एमबीबीएससह विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी ही परीक्षा महत्त्वाची मानली जाते.
राजस्थानमधील बाडमेर येथे घडलेली एक घटना सोशल मीडियावर विशेष चर्चेत आली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये बुरखा परिधान केलेल्या एका विद्यार्थिनीची ओळख पडताळल्यानंतर तिला परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आल्याचे दिसून आले. या घटनेनंतर अनेकांनी सुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीबाबत प्रश्न उपस्थित केले.
सोशल मीडियावरील अनेक प्रतिक्रियांमध्ये असे म्हटले जात आहे की, परीक्षा केंद्रांवर इतकी कठोर तपासणी होत असताना काही पोशाखांना परवानगी कशी दिली जाते ? काहींनी परीक्षा नियमांमध्ये एकसमानता असावी, अशी मागणीही केली आहे.
दरम्यान, गुजरातमधील सुरत येथे आणखी एक प्रकार समोर आला. येथे एका विद्यार्थिनीला तुळशीची माळ घालून परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यास आक्षेप घेतल्याने गोंधळ निर्माण झाला. संबंधित विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी तपासणी प्रक्रियेवर नाराजी व्यक्त केली. व्हिडिओमध्ये विद्यार्थिनीच्या वडिलांनी सुरक्षा तपासणीबाबत प्रश्न उपस्थित करत संताप व्यक्त केल्याचे दिसून आले.
या दोन्ही घटनांनंतर सोशल मीडियावर धार्मिक प्रतीकांबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काही जणांनी हिंदू धार्मिक चिन्हांवर निर्बंध लावले जात असल्याचा आरोप केला, तर दुसरीकडे मुस्लिम विद्यार्थिनींना काही बाबतीत सवलत मिळत असल्याची चर्चा सुरू झाली.
परीक्षा नियमांनुसार, काही विशिष्ट धार्मिक पोशाखांना पूर्वपरवानगीच्या अटींवर परवानगी दिली जाऊ शकते. मात्र, परीक्षा केंद्रांवर सुरक्षा तपासणी अत्यंत कडक पद्धतीने केली जात असल्याचेही अनेक घटनांमधून दिसून आले.
राजस्थानमधील सीकर येथील आणखी एका व्हिडिओमध्ये उमेदवारांच्या कपड्यांची अतिशय बारकाईने तपासणी करण्यात आल्याचे दिसले. काही विद्यार्थ्यांच्या पायजम्याचे नाडे तसेच कपड्यांवरील चेन कापल्यानंतरच त्यांना प्रवेश देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
या सर्व घटनांमुळे नीट परीक्षा तपासणी वाद अधिकच चर्चेत आला असून, परीक्षा प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणि सर्वांसाठी समान नियम लागू करण्याची मागणी विविध स्तरांतून होत आहे.






