मुंबईतील वेव्हज परिषदेत बोलताना नेटफ्लिक्सचे CEO टेड सारंडोस
मुंबईतील वेव्हज परिषदेत बोलताना नेटफ्लिक्सचे CEO टेड सारंडोस

मुंबई – “भारतीय संस्कृतीवर आधारित कथानक जगभरात अधिक लोकप्रिय होत आहे. त्यामुळे चित्रपटकर्मी आणि निर्मात्यांनी या आशयावर भर द्यावा,” असे मत नेटफ्लिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी टेड सारंडोस यांनी मांडले आहे. मुंबईत पार पडलेल्या ‘वेव्हज’ परिषदेत अभिनेते सैफ अली खान यांनी त्यांची मुलाखत घेतली.

या वेळी बोलताना सारंडोस यांनी भारतात नेटफ्लिक्सने केलेल्या गुंतवणुकीचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, “वर्ष २०२३-२४ दरम्यान जगभरात नेटफ्लिक्सवर ३ अब्ज तास भारतीय कार्यक्रम पाहिले गेले. प्रत्येक आठवड्याला लोकप्रियतेच्या यादीत किमान एक भारतीय वेबमालिका असते. २०२१ ते २०२४ दरम्यान नेटफ्लिक्सने भारतात १६,००० कोटी रुपयांचा नफा कमावला असून, यामुळे २०,००० भारतीयांना रोजगार मिळाला आहे.”

ते पुढे म्हणाले की, “भारताच्या ९० शहरांमध्ये नेटफ्लिक्सवरील मालिका आणि चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. आजपर्यंत १५० हून अधिक भारतीय वेबमालिका आणि चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाले आहेत.”