अनुराधापुरा, श्रीलंका – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरकुमार डिसानायके यांनी आज सकाळी श्रीलंकेच्या ऐतिहासिक अनुराधापुरा शहरात भारताच्या सहाय्याने उभारलेल्या रेल्वे प्रकल्पांचे संयुक्त उद्घाटन केले.

या प्रकल्पांमुळे श्रीलंकेच्या उत्तरेकडील भागातून राजधानी कोलंबोपर्यंत सुरक्षित व अखंड रेल्वे संपर्क साधता येणार आहे. यानंतर पंतप्रधान मोदी यांनी जय श्री महा बोधी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. या मंदिर परिसरातील वृक्षाला विशेष महत्त्व आहे – हा वृक्ष भिक्खुणी संघमित्त थेरी यांनी भारतातून आणलेल्या बोधी वृक्षाच्या पाल्यातून उगम पावलेला आहे.

‘महों-ओमानथाई’ या नव्या रेल्वेमार्गाचे उद्घाटन आज करण्यात आले. 91.27 दशलक्ष अमेरिकी डॉलरच्या भारतीय सहाय्याने हा प्रकल्प पूर्ण झाला असून, तो श्रीलंकेच्या उत्तरेकडील भागांना कोलंबोशी जोडणार आहे. यामुळे केवळ परिवहनच नव्हे तर आर्थिक विकासालाही चालना मिळणार आहे.

तसेच, ‘महों- अनुराधापुरा’ या विभागासाठी प्रगत सिग्नल प्रणाली स्थापनेसाठी 14.9 दशलक्ष डॉलरच्या भारतीय अनुदानातून भूमिपूजनही झाले. ही प्रणाली रेल्वे सेवांचा सुरक्षिततेसाठी आणि कार्यक्षमतेसाठी उपयुक्त ठरणार आहे.

काल पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती डिसानायके यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. या भेटीत दोन्ही देशांतील दृढ मैत्रीचे पुनरूज्जीवन झाले. पंतप्रधान मोदींना श्रीलंकेच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक – ‘मित्र विभूषण’ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रांतील सहकार्याबाबत सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या आणि अनेक भारतसहाय्यित प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले.

पंतप्रधान मोदी आज त्यांचा तीन दिवसांचा श्रीलंका दौरा पूर्ण करून मांडपमकडे रवाना होणार आहेत.