मॉस्को (रशिया) – भारताच्या ‘चंद्रयान-३’ नंतर रशियानेही चंद्रावर यान पाठवण्याचा प्रयत्न केला, जो अपयशी ठरला आहे. रशियाने पाठवलेले ‘लुना-२५’ हे यान चंद्रावर कोसळले आहे. ‘चंद्रयान-३’च्या २ दिवस आधी हे यान चंद्रावर उतरणार होते; मात्र १९ ऑगस्टला त्याच्याशी असलेला संपर्क तुटला होता आणि दुसर्या दिवशी ते चंद्रावर कोसळले. २१ ऑगस्ट या दिवशी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर बोगुस्लाव्हस्की विवराजवळ ‘लुना-२५’ उतरणार होते. ११ ऑगस्टला हे यान प्रक्षेपित करण्यात आले होते. रशियाने ४७ वर्षांनंतर चंद्रावर यान पाठवले होते. यापूर्वी वर्ष १९७६ मध्ये रशियाने ‘लुना-२४’ हे यान पाठवले होते.
रशियाची अंतराळ संस्था ‘रोसकॉसमॉस’कडून सांगण्यात आले की, १९ ऑगस्टला संध्याकाळी ५.२७ वाजल्यापासून त्याचा संपर्क तुटला होता. ‘प्री-लँडिंग’ (चंद्रावर उतरण्यापूर्वीची स्थिती) कक्षा पालटतांना तांत्रिक बिघाड झाला.