वटपौर्णिमा हे व्रत का करतात ?

48

वटपौर्णिमा हे व्रत ज्येष्ठ पौर्णिमा या तिथीला करतात. पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सात जन्म त्याच्या प्राप्तीसाठी हिंदू स्त्रिया हे व्रत करतात. वादविवादात यमाला हरवून हरण केलेले पतीचे प्राण परत मिळवणार्‍या सावित्रीच्या पातिव्रत्याचे प्रतीक म्हणून हे व्रत केले जाते. सावित्री आणि यमाचे वटवृक्षाखाली संभाषण झाल्यामुळे या दिवशी वटवृक्षाला महत्त्व प्राप्त झाले. वटवृक्ष आणि वटपौर्णिमा यांचे महत्त्व खालील लेखातून समजून घेऊया.

सावित्रीप्रमाणेच आपल्या पतीचे आयुष्य वाढावे; म्हणून स्त्रियांनी या व्रताचा आरंभ केला. वटपौर्णिमा या व्रताची मुख्य देवता सावित्रीसह ब्रह्मदेव असून सत्यवान, नारद आणि यमधर्म या उपांग (गौण) देवता आहेत. भरतखंडात प्रसिद्ध असलेल्या पतीव्रतांपैकी सावित्री हीच आदर्श मानलेली आहे. तसेच तिला अखंड सौभाग्याचे प्रतीकही मानले जाते.

वडाचे षोडशोपचारे पूजन करावे. पूजेत अभिषेक झाल्यानंतर वडाला सूत्रवेष्टन करावे, म्हणजे वडाच्या खोडाभोवती सुती धाग्याने घड्याळाच्या काट्याच्या दिशेने तीनदा गुंडाळावे. पूजेच्या शेवटी ‘अखंड सौभाग्य लाभू दे, जन्मोजन्मी हाच पती लाभू दे, तसेच धनधान्य आणि कुल यांची वृद्धी होऊ दे’, अशी सावित्रीसह ब्रह्मदेवाला प्रार्थना करतात

वटवृक्षाचे महत्त्व

यमधर्माने सत्यवानाचे प्राण हरण केल्यावर सावित्रीने यमधर्माशी तीन दिवस शास्त्रचर्चा केली. त्यावर प्रसन्न होऊन यमधर्माने सत्यवानाला पुन्हा जिवंत केले. शास्त्रचर्चा वटवृक्षाखाली झाली; म्हणून वटवृक्षाशी सावित्रीचे नाव जोडले गेले.

‘प्रलय झाला तरी वटवृक्ष असतोच. तो युगान्ताचा साथीदार आहे.

बाल मुकुंदाने प्रलयकाळी वटपत्रावर शयन केले.

प्रयागच्या अक्षय्य वटाखाली राम, लक्ष्मण आणि सीता विसावले होते.

ब्रह्मा, श्रीविष्णु, महेश, नृसिंह, नील आणि माधव यांचे वटवृक्ष हे निवासस्थान आहे.

वड, पिंपळ, औदुंबर आणि शमी हे पवित्र अन् यज्ञवृक्ष म्हणून सांगितले आहेत. या वृक्षांत वटवृक्षाचे आयुष्य अधिक असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही पुष्कळ होतो.

अक्षय अशा प्राणाचे दर्शक असणे : ‘वटसावित्रीची पूजा म्हणजे `सावित्रीच्या पातिव्रतेच्या सामर्थ्याची पूजा’; म्हणून या दिवशी वटवृक्षाची पूजा केली जाते. वटवृक्ष हा अक्षय अशा प्राणाचे दर्शक आहे.’

घरी वडाची फांदी आणून तिचे पूजन करण्यापेक्षा प्रत्यक्ष वडाच्या पूजेतून अधिक लाभ मिळणे

वडाच्या मूळ खोडामध्ये अधिक प्रमाणात शिवतत्त्व सामावलेले असल्याने प्रत्यक्ष झाडाची भावपूर्णरित्या पूजा करून ३० प्रतिशत, तर केवळ फांदीच्या पूजेने २ – ३ प्रतिशत एवढ्याच प्रमाणात लाभ मिळण्यास साहाय्य होते. मूळ, खोडविरहित झाडाची फांदी ही झाडाच्या मूळ चेतनेपासून विलग झाल्याने तिच्यामध्ये अचेतनत्व अधिक प्रमाणात असल्याने तिची चैतन्य ग्रहण आणि प्रक्षेपण करण्याची क्षमताही अतिशय नगण्य असते. फांदीतील अचेनत्वाचा परिणाम म्हणून तिची चैतन्य वहन करण्याची क्षमताही अतिशय नगण्य असल्याने घरी वडाची फांदी आणून पूजा करण्याने फारसा लाभ मिळत नाही. ज्या ठिकाणी नैसर्गिकता अधिक असते, त्या ठिकाणी चेतनेचे प्रमाणही अधिक असल्याने चैतन्याच्या फलप्राप्तीचे प्रमाणही अधिक असते. – ‘एक विद्वान’ (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ५.५.२००६, दुपारी १.४५)

माहिती संदर्भ आणि अधिक माहितीसाठी – https://www.sanatan.org/mr/vat-purnima