मुंबई : राज्यात यंदा संभाव्य एल निनो (El Nino) प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता लक्षात घेता शासन सतर्क झाले आहे. या पार्श्वभूमीवर २० एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली. या बैठकीत पाणीटंचाई रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत जलसंधारण प्रकल्पांना गती देणे, उपलब्ध जलस्रोतांचे पुनरुज्जीवन, पाण्याचे योग्य नियोजन आणि भविष्यातील गरजांचा विचार करून दीर्घकालीन उपाययोजना आखण्यावर भर देण्यात आला. यावेळी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत एल निनोचा प्रभाव अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज असून, मे महिन्यात उष्णतेच्या लाटांचा तीव्रतेने सामना करावा लागू शकतो.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, “राज्यात पर्जन्यमान ९० टक्क्यांपेक्षा कमी राहिल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनू शकतो आणि शेतीवरही मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे संभाव्य संकट टाळण्यासाठी आधीच नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे.”
ते पुढे म्हणाले की, मनरेगा योजनेअंतर्गत जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्यात यावे. तसेच, केवळ यंदाच्या नव्हे तर पुढील उन्हाळ्याचा विचार करून पाणी साठवणूक आणि वापर याबाबत नियोजन करणे आवश्यक आहे. प्रत्येक जिल्ह्यात पाणी बचत आणि व्यवस्थापनासाठी स्थानिक पातळीवर टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देशही देण्यात आले.
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, पावसातील अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागू शकते. त्यामुळे अतिरिक्त बियाण्यांचा साठा उपलब्ध ठेवण्यासाठी संबंधित यंत्रणांनी सज्ज राहावे. याशिवाय, खरीप हंगामात पिकांचे नुकसान टाळण्यासाठी खतांचा पुरवठा वेळेवर होणे आवश्यक आहे.
त्यांनी पुढे स्पष्ट केले की, खते आणि बियाण्यांची कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये यासाठी कृषी विभागाने विक्री केंद्रांची नियमित तपासणी करावी.
एल निनो म्हणजे काय?
एल निनो ही हवामानाशी संबंधित एक जागतिक प्रक्रिया आहे. प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान वाढल्यावर त्याचा परिणाम वाऱ्यांच्या हालचालीवर होतो. सामान्य परिस्थितीत हे वारे उष्ण पाणी भारताच्या दिशेने ढकलतात, ज्यामुळे पाऊस पडतो.
मात्र, जेव्हा वाऱ्यांची ताकद कमी होते, तेव्हा हे उष्ण पाणी भारताकडे येण्याचे प्रमाण घटते. परिणामी ढगनिर्मिती कमी होते आणि पावसाचे प्रमाण घटते. याच स्थितीला एल निनो असे म्हणतात.
यंदा वाऱ्यांची तीव्रता कमी राहण्याची शक्यता असल्यामुळे पावसात घट आणि तापमानात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पाणी व्यवस्थापन आणि शेती नियोजन हे राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.







