हवामान पालटामुळे भारताच्या शेतीवर मोठा परिणाम होणार !

23

हवामान पालटामुळे अतीवृष्टी किंवा दुष्काळ, महापूर आणि उष्माघाता यांसारख्या घटना घडू शकतात. यासह भारताच्या शेतीवर मोठा परिणाम होण्याची, तसेच उत्पादन अल्प होण्याची शक्यता ‘इंटरगवर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज’ या संस्थेच्या अहवालात वर्तवण्यात आली आहे.

या अहवालानुसार देशातील समुद्र किनार्‍यांजवळील शहरे आणि हिमालय यांवर याचे गंभीर परिणाम होणार आहेत. त्यामुळे आता विलंब करून चालणार नाही, अन्यथा जगासाठी परिणाम फार धोकादायक असतील. हा अहवाल बनवण्यात सहभागी असणारे अंजल प्रकाश म्हणाले की, येत्या वर्षभरात शहरी लोकसंख्येची संख्या झपाट्याने वाढणार आहे. पुढील १५ वर्षांत देशाच्या लोकसंख्येपैकी ६० कोटी लोक शहरांमध्ये रहाणारे असतील. देशाला ७ सहस्र ५०० किमीचा समुद्रकिनारा लाभला आहे. मुंबई, कोलकाता, चेन्नई, विशाखापट्टणम, पुरी आणि गोवा यांसारख्या भागांत अधिक उष्णता जाणवू शकते. या भागांना समुद्राची पातळी वाढल्याने पुरासारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. एवढेच नाही, तर येथे चक्रीवादळाचाही धोका निर्माण होणार आहे.

या अहवालानुसार, जगातील निम्म्या लोकसंख्येला धोका आहे. सर्व प्रयत्न करूनही पर्यावरणात सुधारणा होतांना दिसत नाही. तापमान १ ते ४ अंश सेल्सिअसने वाढले, तर भारतात तांदूळ उत्पादनात १० ते ३० टक्के, तर मक्याचे उत्पादन २५ ते ७० टक्क्यांनी घटू शकते.

आशियातील कृषी आणि अन्न व्यवस्थेशी संबंधित संकटे हळूहळू वाढतील, तसेच हवामान पालटासह संपूर्ण प्रदेशावर वेगवेगळे परिणाम होतील.

या अहवालात लोकांना त्याच्या धोक्याचा सामना करण्यासाठी आणि त्यांच्या राहणीमानात सुधारणा करण्याच्या मार्गांचे वर्णन केले आहे. सुरत, इंदूर आणि भुवनेश्‍वर ही भारतीय शहरे हवामान पालटाला कोणत्या मार्गाने सामोरे जात आहेत, याचाही या अहवालात उल्लेख आहे.