मुंबई : राज्य शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटीमार्फत आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहाला चांगला प्रतिसाद मिळाला असून देशभरातील १ हजार ८४६ स्टार्टअप्सनी या सप्ताहासाठी नोंदणी केली आहे. आरोग्यविषयक ३२०, शेतीविषयक २५२, शिक्षणविषयक २३८ अशा विविध क्षेत्रातील नवसंकल्पना सादर झाल्या असल्याची माहिती या विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

तरुणांमधील नवसंकल्पनांना प्रोत्साहन देणे, देशातील उद्योजकीय परिसंस्थेला चालना देणे हा या सप्ताह आयोजनामागील उद्देश असून सप्ताहातील उत्कृष्ट स्टार्टअप्सना राज्यातील विविध शासकीय विभागांमध्ये त्यांच्या नवसंकल्पनांचा लाभ देण्यासाठी प्रत्येकी १५ लाख रुपयांच्या कामांचे कार्यादेश देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहाच्या या चौथ्या आवृत्तीसाठी 12 मे 2021 पासून www.msins.in या संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात आले होते. यामध्ये कृषी, शिक्षण व कौशल्य, शासन, आरोग्य सेवा, स्मार्ट पायाभूत सुविधा, गतिशीलता, स्वच्छ ऊर्जा, कचरा व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन यासारख्या क्षेत्रात देशभरातील स्टार्टअप्सनी अर्ज केले आहेत. २७ राज्य व केंद्रशासित प्रदेशांकडून १ हजार ८४६ अर्ज प्राप्त झाले असून महाराष्ट्रातून सर्वाधिक ९४७ अर्ज प्राप्त झाले आहेत. आता या अर्जांची तज्ञांकडून तपासणी केली जाईल आणि जुलै 2021 च्या शेवटच्या आठवड्यात टॉप 100 स्टार्टअपची यादी जाहीर केली जाईल.