पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी ‘पंतप्रधान डिजिटल आरोग्य मिशन’चे लोकार्पण केले

41

गेल्या ७ वर्षांमध्ये देशातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्याची मोहीम चालू करण्यात आली आहे. आज ती एका नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे. आज एका अशा मोहिमेचा प्रारंभ करण्यात येत आहे, ज्यामध्ये भारताच्या आरोग्य सुविधांमध्ये क्रांतीकारी पालट आणण्याची शक्ती आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी ‘पंतप्रधान डिजिटल आरोग्य मिशन’चे लोकार्पण केले. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी हे लोकार्पण केले. याद्वारे देशातील प्रत्येक नागरिकाला ‘आरोग्य ओळखपत्र (हेल्थ कार्ड) देण्यात येणार आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, याअंतर्गत प्रत्येक नागरिकाकडे ‘आरोग्य ओळखपत्र’ असणार आहे. हे ओळखपत्र पूर्णपणे डिजिटल असेल आणि ते आधार कार्डाप्रमाणेच दिसणार आहे. या कार्डावर ‘आधार’ प्रमाणेच एक क्रमांक असेल. याद्वारे आरोग्य क्षेत्रात संबंधित व्यक्तीची ओळख पटवली जाईल. आज आपल्या देशात १३० कोटी आधार क्रमांक, ११८ कोटी भ्रमणभाष वापरकर्ते, ८० कोटी इंटरनेट वापरकर्ते आणि ४३ कोटी जनधन बँक खाती आहेत. असे जगात अन्य ठिकाणी कुठेही नाही.

आरोग्य ओळखपत्र सिद्ध करण्यासाठी केंद्रशासनाच्या ‘स्वास्थ्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालया’च्या संकेतस्थळावरील https://healthid.ndhm.gov.in/register या मागिर्केला भेट द्यावी. तेथे नागरिक स्वत:ची नोंदणी करू शकतात आणि त्याद्वारे आपले ओळखपत्र सिद्ध करू शकतात. या ओळखपत्रामुळे रुग्णांना डॉक्टरांकडे जातांना आरोग्याविषयीची आधीची कागदपत्रे नेण्याची आवश्यकता भासणार नाही. डॉक्टरांनाही क्रमाकांच्या साहाय्याने रुग्णांचा ‘डेटा’ (वैद्यकीय माहिती) मिळेल. याच आधारावर रुग्णांवर पुढील उपचार केले जाणार आहेत. तसेच संबंधित व्यक्तीला कोणत्या सरकारी योजनांचा लाभ मिळतो, हेदेखील त्यावरून समजणार आहे.

या ओळखपत्रासाठी संबंधित व्यक्तीचा भ्रमणभाष क्रमांक आणि आधार कार्ड क्रमांक घेतला जाईल. याच्या साहाय्याने ‘मोबाईल हेल्थ कार्ड’ सिद्ध केले जाणार आहे. यासाठी सरकार एक आरोग्य यंत्रणा बनवेल जी व्यक्तीचा ‘डेटा’ गोळा करणार आहे. ज्या व्यक्तीला आरोग्य ओळखपत्र बनवायचे आहे, त्याची माहिती जमा करण्याची अनुमती आरोग्य यंत्रणेकडून देण्यात येईल