श्री सरस्वतीदेवी

सर्व ऋतूंचा राजा असणार्‍या वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल वसंत पंचमीच्या दिनी लागते. तसेच हा दिवस देवी सरस्वती आणि लक्ष्मी यांचा जन्मदिवसही मानला जातो. वसंत पंचमी या उत्सवामागील इतिहास आणि त्याचे महत्त्व या लेखातून जाणून घेऊया.

वसंत पंचमी हा उत्सव ‘माघ शुद्ध पंचमी या तिथीला साजरा करतात. कामदेव मदनाचा जन्म याच दिवशी झाला, असे म्हटले आहे. दांपत्यजीवन सुखाचे जावे, यासाठी लोक रतिमदनाची पूजा आणि प्रार्थना करत असत. वसंत पंचमी या दिवशी नवीन पिकांच्या लोंब्या आणून त्या घरातील देवतेला अर्पण करून नवान्न ग्रहण करतात. या दिवशी पहाटे अभ्यंगस्नान करून पूजा करतात. वसंत पंचमी या दिवशी वाणीची अधिष्ठात्री देवी सरस्वती हिची पूजा आणि प्रार्थना करण्याचे महत्त्व आहे. हा दिवस देवीचा प्रकटदिन म्हणून मानला जातो. या दिवशी कलशाची स्थापना करून त्यात सरस्वतीदेवीला आवाहन करून तिचे पूजन केले जाते.

या दिवशी सृष्टीतील नवचैतन्य आणि नवनिर्माण यांच्यामुळे झालेला आनंद प्रकट करणे आणि मौज करणे, हा या उत्सवाचा उद्देश आहे.

सरस्वतीचे पूजन आणि आराधना : ब्राह्मणग्रंथांनुसार वाग्देवी सरस्वती ब्रह्मस्वरूपा, कामधेनु आणि समस्त देव यांची प्रतिनिधी आहे. तीच विद्या, बुद्धी आणि ज्ञान यांची देवी आहे. अमित तेजस्विनी आणि अनंत गुणशालिनी देवी सरस्वतीची पूजा अन् आराधना यांसाठी माघ मासातील (महिन्यातील) पंचमी ही तिथी निश्‍चित केली गेली आहे. वसंतपंचमीला तिचा आविर्भाव दिवस मानला जातो. त्यामुळे ‘वागीश्‍वरी जयंती’ आणि ‘श्रीपंचमी’ या नावानेही ही तिथी प्रसिद्ध आहे.

सरस्वतीदेवीचे पूजन करण्याच्या पद्धती : वसंतपंचमीचा हा दिवस सरस्वतीदेवीच्या साधनेसाठीच अर्पण केला जातो. शास्त्रांमध्ये भगवती सरस्वतीची आराधना वैयक्तिक स्वरूपात करण्याचे विधान आहे; पण सध्या सार्वजनिक पूजामंडपांत देवी सरस्वतीची मूर्ती स्थापन करून तिची पूजा करण्याचा प्रघात चालू झाला आहे. हा ज्ञानाचा सण असल्यामुळे विद्यार्थी शिक्षण संस्थेची सजावट करतात. विद्यारंभ संस्कारासाठी हा सर्वोत्कृष्ट मुहूर्त आणि दिवस असतो.

वसंतपंचमी हा सर्व प्रकारच्या शुभकार्यांसाठी अत्यंत शुभमुहूर्त मानला गेला आहे. यांत प्रामुख्यानेे नवी विद्याप्राप्ती आणि गृहप्रवेश यांसाठी वसंतपंचमीला पुराणांतही अतिशय श्रेयस्कर मानले गेले आहे. वसंतपंचमीला शुभमुहूर्त मानण्यामागे अनेक कारणे आहेत. हे पर्व बहुतेक वेळा माघ मासातच येते. माघ मासाचे धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टीनेही विशेष महत्त्व आहे. या मासात ‘पवित्र तीर्थक्षेत्री स्नान करणे’, हे विशेष महत्त्वाचे मानले गेले आहे.

या काळात सूर्यदेवाचे उत्तरायण असते. पुराणांमध्ये उल्लेख आढळतो, ‘देवतांची एक अहोरात्र (दिवस-रात्र) ही मनुष्याच्या एक वर्षाच्या समान असते. उत्तरायणाला देवतांचा दिवस आणि दक्षिणायनाला देवतांची रात्र मानले जाते. १४ जानेवारी या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि पुढील ६ मास उत्तरायण असते.’ सूर्याचे मकर राशीतून मिथुन राशींपर्यंतचे भ्रमण उत्तरायण समजले जाते. देवतांचा दिवस माघ मासातील मकरसंक्रांतीपासून प्रारंभ होऊन तो आषाढ मासापर्यंत चालतो. त्यानंतर आषाढ मासातील शुक्ल पक्षातील एकादशीपासून कार्तिक मासातील शुक्ल पक्षातील एकादशीपर्यंतचा काळ हा विष्णूचा शयनकाळ मानला जातो. या काळात सूर्यदेव कर्क राशीतून धनु राशीपर्यंत भ्रमण करतो. याला सूर्याचा दक्षिणायन काळ असेही म्हणतात. सामान्यपणे या काळात शुभ कार्ये वर्ज्य मानली गेली आहेत

ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने सूर्याला ब्रह्मांडाचा आत्मा, पद, प्रतिष्ठा, भौतिक समृद्धी, औषधी, बुद्धी आणि ज्ञान यांचा कारक ग्रह मानला गेला आहे. याच प्रकारे पंचमीची तिथी कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित केली गेली आहे. वसंतपंचमीला मुख्यत्वे सरस्वतीचे पूजनच महत्त्वाचे मानले गेले आहे. या ऋतूमध्ये निसर्गाला ईश्‍वरप्रदत्त वरदान म्हणून हिरवळ, रोपे आणि वृक्ष यांवर पल्लवित पुष्प अन् फळे यांच्या रूपात स्पष्टपणे पाहिले जाऊ शकतो.’

मत्स्यपुराणातील सरस्वतीदेवीचा महिमा : सरस्वतीदेवीचे रूप आणि सौंदर्य यांविषयीचा एक प्रसंग मत्स्यपुराणातही आला आहे. ब्रह्मदेवाने जेव्हा या विश्‍वाची निर्मिती करण्याच्या इच्छेने आपल्या हृदयात सावित्रीचे ध्यान करून तप करण्यास प्रारंभ केला, त्या वेळी त्याचे निष्पाप शरीर २ भागांत विभक्त झाले. त्यांमध्ये अर्धा भाग स्त्रीचा आणि अर्धा भाग पुरुषाचा झाला. ती स्त्री सरस्वती आणि शतरूपा या नावांनी प्रसिद्ध झाली. तीच सावित्री, गायत्री आणि ब्रह्माणी म्हणून ओळखली जाते. अशा प्रकारे आपल्या शरिरातून निर्माण झालेल्या सावित्रीला पाहून ब्रह्मदेव मुग्ध होऊन म्हणाला, ‘‘हे किती सौंदर्यवान रूप आहे ! हे किती मनोहर रूप आहे !!’’त्यानंतर सुंदरी सावित्रीने ब्रह्मदेवाला प्रदक्षिणा घातली. सावित्रीच्या रूपाचे अवलोकन करण्याची इच्छा झाल्यामुळे ब्रह्मदेवाच्या मुखाच्या मागील उजव्या बाजूला एक नवे मुख प्रकट झाले. पुन्हा विस्मययुक्त आणि फडफडणारे ओठ असलेले तिसरे मुखही मागील बाजूला प्रकट झाले आणि त्याच्या उजव्या बाजूला कामदेवाच्या बाणांनी व्यथित झालेल्या एका मुखाचा आविर्भाव झाला.

वाल्मीकि रामायणातील सरस्वतीदेवीविषयीची कथा : ‘सरस्वतीने आपल्या चातुर्याने देवांना राक्षसराज कुंभकर्णापासून कसे वाचवले ?’, याची एक मनोरम कथा वाल्मीकि रामायणाच्या उत्तरकांडात आहे. देवीचा वर मिळवण्यासाठी कुंभकर्णाने १० सहस्र वर्षे गोवर्णात घोर तपस्या केली. जेव्हा ब्रह्मदेव वर देण्यास सिद्ध झाले, तेव्हा देव त्यांना म्हणाले, ‘‘कुंभकर्ण हा राक्षस आहे आणि तो आपण वर दिल्यामुळे अधिकच उन्मत्त होईल.’’ तेव्हा ब्रह्मदेवाने सरस्वतीचे स्मरण केले. मग सरस्वती त्या राक्षसाच्या जिभेवर आरूढ झाली. सरस्वतीच्या प्रभावामुळे कुंभकर्ण ब्रह्मदेवाला म्हणाला,

स्वप्तुं वर्षाण्यनेकानि देव देव ममेप्सितम् । – वाल्मीकिरामायण, कांड ७, सर्ग १०, श्‍लोक ४५

अर्थ : ‘मी अनेक वर्षांपर्यंत झोपून रहावे’, अशी माझी इच्छा आहे.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’