‘ऑनलाईन’च्या काळात डोळ्यांची काळजी घेण्यासाठीचे उपाय !

67

सध्या सर्वच ठिकाणी ‘ऑनलाईन’ शिक्षण चालू झाले आहे. अगदी बालवाडीपासून ते पदवीपर्यंत सर्वच जण ऑनलाईन शिकत आहेत. कुठेही बाहेर न जाता तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपण सद्यःस्थितीतही शिक्षण चालू ठेवले आहे. त्यामुळे मुलांपासून ते प्रौढ व्यक्तींपर्यंत सर्वजण संगणक आणि भ्रमणभाष यांचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत. या अमर्याद वापरामुळे डोळ्यांवर सर्वाधिक विपरीत परिणाम होत आहेत.

१. सर्वप्रथम डोळ्यांना योग्य प्रकारे आराम द्या. व्यवस्थित झोप घेणे, हाच यावरील रामबाण उपाय आहे. रात्रीचे जागरण आणि दिवसाची झोप टाळावी.

२. डोळ्यांना व्यवस्थित पोषण मिळण्यासाठी संतुलित आहार घ्या. जेवणामध्ये स्निग्ध पदार्थांचा (तूप) वापर जरूर करावा. जंकफूड कटाक्षाने टाळावेत.

३. तहान लागली की, पाणी प्यावे. एकाच वेळी जास्त पाणी पिणे टाळावे, तसेच इतर शारीरिक वेगांना (मल-मूत्र) टाळू नये.

४. काम करतांना बसण्याची जागा व्यवस्थित असावी. संगणक डोळ्यांपासून दीड ते दोन फूट अंतरावर डोळ्यांच्या पातळीच्या खाली असावा.

५. काम करतांना खोलीमध्ये पुरेसा प्रकाश आणि हवा खेळती रहाणे आवश्यक आहे.

६. संगणक आणि भ्रमणभाष यांचा ‘ब्राईटनेस’ डोळ्यांना व्यवस्थित दिसेल, असा करून घ्यावा. वाचतांना ‘ब्लू लाईट फिल्टर’ जरूर वापरावा.

७. जर चष्मा असल्यास पुन्हा एकदा नेत्रतपासणी करून ‘ब्लू ब्लॉक कोटिंग’चा चष्मा घ्यावा. त्यामुळे डोळ्यांना अतीनील किरणांपासून संरक्षण मिळते.

८. संगणकीय काम करतांना प्रत्येक २० मिनिटांनी २० सेकंदासाठी डोळ्यांना आराम देऊन बाहेरची अथवा दूरची २० फुटांवरील वस्तू पहाणे, हा नियम कटाक्षाने पाळावा, असे जागतिक कीर्तीचे नेत्ररोगतज्ञ सुद्धा सांगत आहेत. यामुळे डोळ्यांच्या पेशींवरील ताण न्यून होऊन डोळ्यांना आराम मिळतो.

९. अधूनमधून डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप करावी. त्यामुळे डोळ्यांचा ओलावा टिकून रहातो.

१०. डोळे अधूनमधून थंड पाण्याने धुवावेत. तोंडामध्ये पाणी भरून (गाल फुगवून) बंद डोळ्यांवर साधारण २१ वेळा पाणी शिंपडावे. नंतर तोंडातील पाणी थुंकावे. यामुळे डोळ्यातील उष्णता न्यून होऊन डोळे तजेलदार होतात. यालाच आयुर्वेदात ‘नेत्रसेचन’ किंवा ‘नेत्रप्रक्षालन’ म्हणतात.

११. आयुर्वेदोक्त ‘गंडूष क्रिये’चा (Oil pulling) वापर करावा. सकाळी दात घासल्यावर कोमट तीळतेल तोंडामध्ये साधारण १५ मिनिटे धरून ठेवावे आणि नंतर ते थुंकून गरम पाण्याने चूळ भरावी. यामुळे डोळ्यांना विशेष लाभ होतो.

१२. आयुर्वेदोक्त ‘अंजन’ वैद्यकीय सल्ल्याने जरूर वापरावे. त्यामुळे डोळ्यातील विकृत दोष बाहेर येण्यास साहाय्य होते.

१३. शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान शिकून घ्यावे. त्यामुळे शिकतांना आणि शिकवतांना लागणारा वेळ वाचून डोळ्यांना आराम मिळेल. शिक्षकांनी शिकवतांना स्वतः मध्ये अल्पविश्राम (ब्रेक) घेऊन मुलांना ही अल्पविश्राम घेण्यास प्रवृत्त करावे.

१४. काम करतांना थोडी विश्रांती घेऊन, तसेच जागेवरून उठून पाय मोकळे करावेत. प्रतिदिन व्यायाम, योगासने, प्राणायाम यांचा अवश्य अवलंब करावा.

१५. डोळ्यांसाठी उपयुक्त असे व्यायाम (डोळ्यांच्या हालचाली) करावेत, तसेच योगामधील ‘त्राटक क्रिया’ करावी. डोळ्यांना आराम देण्यासाठी तळहात एकमेकांवर घासून ते बंद डोळ्यांवर जास्त जोर न देता ठेवावेत. यामुळे डोळ्यातील रक्ताभिसरण सुधारते.

या सर्वांचा अवलंब ऑनलाईन शिकतांना किंवा शिकवतांना जरूर करावा. त्यामुळे डोळ्यांचे रक्षण होईल, तसेच काही तक्रार असल्यास नेत्ररोगतज्ञांचा सल्ला घ्यावा. योग्य वेळी उपचार घेऊन डोळे, शरीर आणि मन यांचे आरोग्य अबाधित ठेवावे.

डॉ. निखिल माळी, आयुर्वेद नेत्ररोगतज्ञ, चिपळूण, जिल्हा रत्नागिरी (संदर्भ – दैनिक सनातन प्रभात )