मुंबई – सध्या चालू असलेल्या ‘आय्.पी.एल्.’ क्रिकेट सामन्याचे समालोचन हिंदी, इंग्रजी, तेलुगु, कानडी आणि बंगाली या भाषांमध्ये आहे, मग मराठीत का नाही ? असा प्रश्न उपस्थित करून ‘आय.पी.एल्.’ संपेपर्यंत मराठीत समालोचनाचा पर्याय द्या अन्यथा आमच्या पद्धतीने आंदोलन करू, असे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ‘डिस्ने हॉटस्टार’ या आस्थापनाला पाठवले आहे. ‘हॉटस्टार डिस्ने’च्या ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’वरून ‘आय.पी.एल्.’ सामन्यांचे समालोचन करण्यात येत आहे. हे समालोचन विविध प्रादेशिक भाषांमध्ये करण्यात येत आहे; मात्र ‘आय.पी.एल्.’चा मोठा दर्शकवर्ग मुंबईमध्ये असतांनाही मराठी भाषेत समालोचन नसल्यामुळे मनसेने ही चेतावणी दिली आहे.
याविषयी ‘ट्वीट’द्वारे माहिती देतांना मनसेच्या कामगार सेनेचे चिटणीस केतन नाईक यांनी सांगितले की, ‘डिस्ने हॉटस्टार’चे मुख्य कार्यालय मुंबईत आहे. त्याचप्रमाणे ‘आय.पी.एल्.’चा मोठा प्रेक्षकवर्ग मराठी आहे. असे असतांना तुम्हाला मराठीचा विसर पडलेला दिसत आहे. यासाठी मनसेला आंदोलन करावे लागल्यास उद्भवणार्या सर्व परिस्थितीचे दायित्व तुमचे राहील. यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण आली, तर आम्ही आवश्यक ते सहकार्य करू; पण नुसतीच चालढकल केलीत, तर महाराष्ट्र सैनिकांशी गाठ आहे, हे लक्षात असू द्या. महाराष्ट्रात एकापेक्षा एक असे उत्तम समालोचक आहेत. आवश्यकता असल्यास आम्ही शोधून देऊ.
Source – sanatanprabhat.org, image courtesy – Wikipedia