या दिवशी मृत्यूची देवता यम आपल्या बहिणीकडे जेवायला जात असल्याने नरकातील जिवांना या दिवशी नरकयातना भोगाव्या लागत नाही, असे म्हटले जाते. तसेच या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. पुराणकाळापासून चालत आलेल्या या सणाबाबतची शास्त्रीय माहिती या लेखाच्या माध्यमातून करून घेऊया.

या दिवशी भावाने बहिणीकडे जावे आणि बहिणीने भावाला ओवाळावे. एखाद्या स्त्रीला भाऊ नसेल, तर तिने कोणाही परपुरुषाला भाऊ मानून त्याला ओवाळावे. ते शक्य नसल्यास चंद्राला भाऊ मानून ओवाळावे. `या दिवशी कोणत्याही पुरुषाने स्वतःच्या घरी पत्नीच्या हातचे अन्न घ्यायचे नसते. त्याने बहिणीच्या घरी जावे अन् तिला वस्त्रालंकार वगैरे देऊन तिच्या घरी भोजन करावे. सख्खी बहीण नसेल, तर कोणत्याही बहिणीकडे किंवा अन्य कोणत्याही स्त्रीला भगिनी मानून तिच्याकडे जेवावे.’

आध्यात्मिक महत्त्व : या दिवशी धर्मशास्त्राने भावा-बहिणीचे नाते जोपासण्यावर विशेष भर दिलेला आहे. पुरुषाच्या मनात स्त्रीप्रती शुद्धभाव निर्माण होऊन चित्तावरील कामवासनेचा विकार न्यून व्हावा, हाच या मागील उद्देश आहे. ज्याप्रमाणे आईचे मुलावर असणारे प्रेम निर्मळ असते, तसेच बहिणीचेही भावावरील प्रेम पवित्र असते. या प्रेमाची देवाण-घेवाण होऊन एकमेकांविषयीचा कृतज्ञताभाव जागृत होण्यासाठी भाऊ आणि बहीण भाऊबीज साजरी करतात.

या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला; म्हणून या दिवसाला ‘यमद्वितीया’ असे नाव मिळाले.

यम हा सूर्यपुत्र आहे. या तिथीला यमामध्ये असणारा तमोगुण अल्प होऊन त्याच्यातील सत्त्व गुण वृद्धींगत होतो. त्यामुळे यमाचे उग्र आणि रौद्र रूप शांत होऊन तो सौम्य बनतो. यमाकडून लयकारी आणि विनाशकारी शक्ती प्रक्षेपित न होता स्थितीच्या कार्यासाठी पूरक असणारी धारिणी अन् पोषिणी या शक्तींचे प्रक्षेपण चालू होते.

या दिवशी यमाचे रूप सौम्य झाल्यामुळे त्याची तारक शक्ती कार्यरत असते. यम हा सूर्यपुत्र असून यमुना ही सूर्यपुत्री आहे. या तिथीला यम आणि यमुना हे भाऊ अन् बहीण एकमेकांना भेटून आनंद साजरा करतात. सूर्याच्या अंशापासून निर्माण झालेल्या यम आणि यमुना या दैवी शक्तींची सात्त्विक भेट प्रथम भूलोकात (पृथ्वीवर) होते अन् त्यानंतर ते माता-पिता सूर्यदेव आणि संध्या यांना भेटण्यासाठी सूर्यलोकात जातात. त्यामुळे त्यांच्याकडून प्रक्षेपित होणार्‍या सूर्याच्या सत्त्वप्रधान तेजोलहरी आणि मंगलकारी शक्ती ग्रहण करण्यासाठी पृथ्वीवर भाऊबीज साजरी केली जाते.

अपमृत्यू येऊ नये म्हणून धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी आणि यमद्वितीया या दिवशी मृत्यूची देवता ‘यमधर्म’ हिचे पूजन करतात.

आध्यात्मिक महत्त्व : कार्तिक मासात १२ आदित्यांपैकी पूषा हा आदित्य कार्यरत असतो. याचे तत्त्व आणि चैतन्य ग्रहण करता यावे यासाठी आदित्याचे सगुण रूप असणार्‍या सूर्याचे पूजन करणे योग्य आहे. यम हा सूर्यपुत्र असल्याने सूर्याचा प्रतिनिधी आणि धर्माचे प्रतीक म्हणून या दिवशी यमधर्माचे पूजन केले जाते. यमदेव प्रसन्न झाल्यामुळे जिवावर आलेले अपमृत्यूचे संकट दूर होते.

या दिवशी यमराज आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला जातो अन् त्या दिवशी नरकात पिचत पडलेल्या जिवांना त्या दिवसापुरते मोकळे करतो.’

आध्यात्मिक महत्त्व : या दिवशी यमाचे तारक रूप कार्यरत झाल्यामुळे त्याच्याकडून प्रक्षेपित होणार्‍या लयकारी तमप्रधान लहरींचे प्रक्षेपण उणावते. त्यामुळे नरकात पिचत पडलेल्या पापी जिवांना या दिवशी अत्यल्प प्रमाणात नरकयातना भोगाव्या लागतात. त्यामुळे यमद्वितीया हा नरकातील पापी जिवांसाठी आनंदाचा दिवस असतो.

हा दिवस मातेच्या गर्भातून जन्म घेतलेल्या जिवांना एकमेकांविषयी वाटणारा जिव्हाळा व्यक्त करण्याचा दिवस आहे.

उ. या दिवशी जी बहीण आपल्या भावासाठी श्री यमाईदेवीकडे काही मागणे मागते, तिच्या भावानुसार ते भावाला मिळते. त्यामुळे तिचे भावाशी असलेले देवाण-घेवाण हिशोब काही प्रमाणात संपुष्टात येतात.

ऊ. या दिवशी स्त्री जिवात असलेले देवीतत्त्व जागृत होते आणि त्याचा भावाला लाभ होतो. भाऊ पूर्णवेळ साधना करणारा असेल, तर त्याला आध्यात्मिक लाभ होतो आणि तो साधना करणारा नसेल, तर त्याला व्यावहारिक लाभ होतो. भाऊ व्यवहार सांभाळून साधना करत असेल, तर त्याला आध्यात्मिक आणि व्यावहारिक लाभ ५०-५० टक्के होतो.

संदर्भ व अधिक माहिती – सनातन संस्था