spacecraft on nuclear energy
Image by Pete Linforth from Pixabay

बेंगळुरू/वॉशिंग्टन – भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो ‘चंद्रयान ३’च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर आता परमाणू ऊर्जेवर चालणार्‍या यानाची निर्मिती करीत आहे. यासाठी इस्रोने भारतातील अग्रणी परमाणू संस्था ‘भाभा अ‍ॅटॉमिक रिसर्च सेंटर’ म्हणजेच ‘बार्क’समवेत करार केला आहे. विशेषज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार रसायनांमुळे चालणार्‍या यानांना मर्यादा असून परमाणू ऊर्जेच्या माध्यमातून अंतराळात एका ग्रहातून दुसर्‍या ग्रहापर्यंत यान पाठवणे शक्य होऊ शकते. दुसरीकडे सौर ऊर्जेचा वापर करायचे म्हटले, तर सूर्यप्रकाश पोचत नसलेल्या ठिकाणी याचा उपयोग होऊ शकणार नाही. यामुळेच इस्रोने परमाणू ऊर्जेवर काम करण्यास आरंभ केला आहे. यासाठी ‘इस्रो’ आणि ‘बार्क’ या संस्था ‘रेडियो थर्मोइलेक्ट्रिक जनरेटर’ला विकसित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

‘रेडियो थर्मोइलेक्ट्रिक जनरेटर’ म्हणजे काय ?

‘रेडियो थर्मोइलेक्ट्रिक जनरेटर’ या यंत्रामध्ये किरणोत्सर्गी सामग्रीचा (‘रेडिओअ‍ॅक्टिव्ह मटेरियल’चा) वापर केला जातो. या सामग्रीला नष्ट करण्यातून निर्माण झालेली उष्णता विद्युत् निर्मिती करते. त्या माध्यमातून बॅटरीला चार्ज केले जाते. ही बॅटरी यानाला आवश्यक ऊर्जा आणि शक्ती प्रदान करते. हे तंत्रज्ञान तसे नवीन नसून अमेरिकी अंतरिक्ष संस्था ‘नासा’ची ‘कैसिनी’ (वर्ष २००४), ‘क्युरिऑसिटी’ (वर्ष २०११) आणि ‘वोयाजर’ (वर्ष २०१८) या यानांमध्ये अशा प्रकारचे तंत्रज्ञान वापरण्यात आले होते.

यानाला एका ग्रहावरून दुसर्‍या ग्रहावर गतीने नेऊ शकणार्‍या तंत्रज्ञानावर ‘नासा’चे कार्य चालू !

नासा आता ‘न्यूक्लिअर थर्मल प्रॉपल्शन’ नावाच्या नव्या तंत्रज्ञानावर कार्य करीत आहे. या तंत्रज्ञानाला वर्ष २०२७ पर्यंत कार्यान्वित करण्याची नासाची योजना आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अंतराळवीर एका ग्रहापासून दूर असलेल्या दुसर्‍या ग्रहावर (उदा. चंद्र, मंगळ ग्रह आदी) पुष्कळ गतीने जाऊ शकणार आहेत. केवळ अल्प वेळेतच नव्हे, तर हा प्रवास अल्प धोक्याचाही असणार आहे. चीनही अशा प्रकारच्या तंत्रज्ञानावर काम करीत आहे.