देशाच्या दृष्टीने ‘चंद्रयान ३’ हा अतिशय महत्त्वाकांक्षी असा कार्यक्रम आहे. यामुळे चंद्रावर हळूवार (सॉफ्ट लँडिंग) अवतरण करणारे अमेरिका, रशिया आणि चीन यांच्यानंतर भारत हे चौथे राष्ट्र असणार आहे.
वर्ष २०१९ मध्ये ‘चंद्रयान २’ मोहीम थोडीशी अयशस्वी झाल्यानंतर भारताची ही दुसरी मोहीम आहे. ‘चंद्रयान ३’ मोहिमेचे यश भारतासाठी एक मोठा विजय आहे; कारण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारी ही जगभरातील पहिलीच मोहीम असेल. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाविषयी अजूनही फार माहिती उपलब्ध नाही. तेथे सावलीत असणार्या चंद्राच्या पृष्ठभागाचे क्षेत्र चंद्राच्या उत्तर ध्रुवापेक्षा पुष्कळ मोठे आहे. याचाच दुसरा अर्थ असा की, कायमस्वरूपी सावली असलेल्या भागात पाणी असण्याची शक्यता आहे.
‘चंद्रयान १’ ने वर्ष २००८ मध्ये दक्षिण ध्रुवाजवळ चंद्रावर पहिले पाणी शोधले होते. त्यामुळेच ‘आम्हाला या ठिकाणी अधिक वैज्ञानिक स्वारस्य आहे; कारण महत्त्वपूर्ण वैज्ञानिक शोध लावायचे असतील, तर दक्षिण ध्रुवासारख्या नवीन भागातच जावे लागेल. लँडिंगसाठी सुरक्षित असलेल्या विषुववृत्तीय प्रदेशावर इतर राष्ट्रे अगोदर पोचली आहेतच आणि त्या ठिकाणची भरपूर माहितीही (‘डेटा’ही) उपलब्ध आहे. त्यामुळेच या मोहिमेविषयी जगातील इतर देशांनीही स्वारस्य दाखवले आहे’, असे ‘इस्रो’चे प्रमुख श्री. सोमनाथ यांनी म्हटले आहे.
दुसरे असे की चंद्राच्या विषुववृत्तीय प्रदेशापेक्षा दक्षिण ध्रुवावर अवतरण करणे, हे तुलनेने जोखमीचे आहे. कोणतीही अंतर्ग्रहीय अथवा चंद्र मोहीम, म्हणजे एखाद्या देशासाठी भविष्यातील अवकाश मोहिमांचे प्रवेशद्वारच असते. साहजिकच भारतवर्षासाठी ही मोहीम अतिशय महत्त्वाची आहे.
– प्रा. बाबासाहेब सुतार, साहाय्यक प्राध्यापक, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी.
लेख साहाय्य – दैनिक सनातन प्रभात.