बेंगळुरू (कर्नाटक) – ज्या जागेवर ‘चंद्रयान-३’चे ‘विक्रम लँडर’ उतरले, ते ठिकाण यापुढे ‘शिवशक्ती’ या नावाने ओळखले जाईल, अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली. अंतराळ मोहिमेत प्रत्यक्ष उतरण्याच्या जागेला (‘टच डाऊन पॉईंट’ला) एक नाव देण्याची वैज्ञानिक परंपरा आहे. याच आधारावर भारताने ‘विक्रम लँडर’ उतरल्याच्या स्थळाला ‘शिवशक्ती’ नाव दिले आहे.
शिवशक्ती’ या शब्दाचा अर्थ विशद करतांना पंतप्रधान म्हणाले की, ‘शिवा’मध्ये मानवतेच्या कल्याणाचा संकल्प आहे आणि ‘शक्ती’मुळे त्या संकल्पांना पूर्ण करण्यासाठी सामर्थ्य मिळते. चंद्रावरील ‘शिवशक्ती पॉइंट’ हा हिमालयाला कन्याकुमारीशी जोडल्याचा बोध करून देत आहे. ज्या मनाने आपण कर्तव्य कर्म करतो, तसेच विचार आणि विज्ञान यांना गती देतो , ते मन शुभ आणि कल्याणकारी संकल्पाशी जोडलेले रहावे. यासाठी शक्तीचा आशीर्वाद अनिवार्य आहे. ही शक्ती, म्हणजे आपली नारी शक्ती होय.