वास्तविक आषाढ मासातील अमावस्येला मांसाहार करून गौरींच्या जेवणापर्यंत मांसाहार बंद ठेवला जात असे. कारण –
१. या कुंद पावसाळी वातावरणात मांसाहार पचत नाही.
२. हा काळ बहुतेक प्राण्यांचा प्रजनन काळ असतो. याच काळात प्राण्यांची हत्या केली, तर सर्व निसर्गचक्रावरच विपरित परिणाम होतो. त्यामुळे निसर्गपुत्र कोळीबांधव या काळात मासेमारी करत नाहीत आणि सरकारी पातळीवरूनही मासेमारीवर बंदी घालण्यात येते.
३. बाहेरच्या वातावरणामुळे प्राण्यांच्या शरीरात आणि शरीरावर अनेक घातक जीवजंतू असण्याची शक्यता असते. शिजवतांना त्यांचा पूर्ण नाश न झाल्यास त्याचाही खाणार्याला त्रास होऊ शकतो.
४. अत्यंत दुर्मिळ आणि प्रकृतीला पोषक अशा अनेक भाज्या याच काळात उगवतात. शाकाहारामुळे अशा भाज्या आपोआपच खाल्ल्या जातात.
या सणाला घरातले सर्व दिवे धुवून त्यांची पूजा केली जाते, दिवे आपल्या जीवनातील अंधार दूर करून आपल्याला प्रकाश देतात, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण !
त्यामुळे या सणाला दीप अमावास्याच म्हणावे, अगदी चेष्टेने सुद्धा गटारी म्हणू नका. कोणीही या दिवशी दारू प्यायला सांगत नाही, उलट दिव्यांची पूजा करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायला सांगतात.
आजही या दिवशी महाराष्ट्र्रातील लाखो मराठी घरात असेच मनोभावे दीपपूजन करून अत्यंत वैशिट्यपूर्ण नैवेद्य दाखवतात. खूप आनंददायी आणि मंगल अशी ही दीप-अमावास्या आपण सर्वांनी उत्साहात साजरी करूया आणी आपली संस्कृती जपुया.
‘पृथ्वीवरील सर्व सजीव-निर्जीव पदार्थ हे पृथ्वी, जल, अग्नी, वायु आणि आकाश या पंचतत्त्वांमुळे निर्माण झाले आहेत. पंचतत्त्वांपैकी अग्नितत्त्वाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अग्नीचा गुण ‘रूप’ असून अग्नीमुळे आपण समोरची वस्तू (रूप) पाहू शकतो. ‘नेत्र’ हे ज्ञानेंद्रिय अग्नितत्त्वाशी संबंधित आहे. अग्नि आपल्या प्रकाशाने अंधःकाराचा नाश करून सत्याचे ज्ञान करून देतो. प्राणीमात्राच्या उदरात अग्नि ‘वैश्वानर’ या रूपाने वास करून अन्नपचन करतो. ग्रहमालेचा अधिपती सूर्य हा अग्नीचे रूप असून तो अखिल विश्वाचेे भरण-पोषण करतो.
वैदिक काळात अग्निदेवतेचे स्थान सर्वोच्च होते. ऋग्वेदात अग्नीला ‘होता’ असे विशेषण आहे. ‘होता’ म्हणजे देव किंवा शक्ती यांचे आवाहन करणारे माध्यम ! यज्ञात संबंधित देवतांना आवाहन केल्यावर अग्नि यज्ञातील हविर्भाग त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. त्यामुळे अग्नीला देव आणि मानव यांना जोडणारा दुवा मानले गेले आहे.’ (संदर्भ : भारतीय संस्कृतिकोश, खंड पहिला, पृ. ७८)
‘आषाढ अमावास्येला ‘दीपान्वित अमावास्या’ असेही म्हणतात. या दिवशी दिव्यांचे पूजन केले जाते. सुवासिनी स्त्रिया घरातील दिवे स्वच्छ आणि एकत्रित करून त्यांच्याभोवती रांगोळी काढतात. ते दिवे प्रज्वलित करून त्यांची पूजा करतात. पूजेत पक्वान्नांचा नैवेद्य दाखवतात आणि पुढील मंत्राने दिव्याची प्रार्थना करतात.
दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजसां तेज उत्तमम् ।
गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव ॥
अर्थ : हे दीपा, तू सूर्यरूप आणि अग्नीरूप आहेस. तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर.
यानंतर दिव्याची कहाणी ऐकतात. हे पूजन केल्याने ‘आयुरारोग्य आणि लक्ष्मी यांची प्राप्ती होते’, अशी फलश्रुती आहे.’ (संदर्भ : भक्तिकोश, चतुर्थ खंड, पृ. ८७७)
– श्री. राज कर्वे, ज्योतिष विशारद, फोंडा, गोवा. (४.८.२०१८)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात